दोन वर्षांनी भरणार वांद्रे येथील ‘माऊंट मेरी जत्रा

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे होऊ न शकलेल्या वांद्रे येथील माऊंट मेरी जत्रेचे यंदा ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर सगळे सण, उत्सव निर्बंधमुक्त झाले असून उत्सवप्रेमींची लगबग सुरू झाली आहे.

वांद्रे (पश्चिम) येथील १०० हून अधिक वर्ष जुन्या माऊंट मेरी बेसलिका चर्चतर्फे दरवर्षी जत्रा भरविण्यात येते. ही जत्रा मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण असते. अनेक वर्षांपासून दरवर्षी सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारदरम्यान ‘वांद्रे जत्रौत्‍सवा’चे (आई माऊंट मेरी जत्रा) आयोजन करण्‍यात येते.

सुमारे ३०० वर्षांपूर्वीपासून या जत्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या जत्रेच्या नियोजनात मुंबई महानगरपालिका, राज्‍य सरकार (स्‍थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलिस इत्‍यादी), बेस्‍ट या सर्वांचा सहभाग असतो. जत्रेसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा मिळाव्या, तसेच त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन विविध यंत्रणांमार्फत व्यवस्था करण्यात येत.

मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि चर्चच्या प्रतिनिधीनी नुकताच जत्रेच्या आयोजनाच्या दृष्टीने प्राथमिक आढावा घेतला. दोन वर्षांनंतर होत असलेल्या या जत्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

या जत्रेसाठी सर्व धर्माचे लोक आवर्जून येतात. या जत्रेत मेणबत्ती, फुले, खाद्यापदार्थ, चणेफुटाण्याचा प्रसाद आदींची ४०० हून अधिक तात्पुरती दुकाने उभारण्यात येतात. त्यातील काही दुकाने स्थानिक रहिवाशांसाठी राखीव असून चर्चच्या अगदी जवळच्या दुकानांसाठी लिलाव करण्यात येतो.


हेही वाचा

राज्य सरकारच्या दहीहंडी, गणेशोत्सवानिमित्त महत्त्वाच्या घोषणा, वाचा सर्व नियम

यंदा गणेशोत्सव-दहीहंडी जल्लोषात साजरी करा, मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध घेतले मागे

पुढील बातमी
इतर बातम्या