बेल्जियमची रॉयल फॅमिली बालहक्कांसाठी वीरेंद्र सेहवागसोबत क्रिकेटच्या मैदानावर!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

एखाद्या देशाचे राजा-राणी शाळकरी मुलांसोबत क्रिकेट खेळतात असं जर तुम्हाला कळलं, तर तुमचा त्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे घडलंय. आणि तेही आपल्या मुंबईत! बेल्जियमच्या राजघराण्याचे राजा आणि राणी 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी शुक्रवारी मुंबईतल्या ओव्हल मैदानावर भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि काही शाळकरी मुलांसोबत चक्क क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला!

बालहक्कांच्या पुरस्कारासाठी क्रिकेट!

बाल हक्काचा पुरस्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यामध्ये मुंबईतल्या दोन शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबतच माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि बेल्जियमच्या राजा आणि राणीनेही सहभाग घेतला होता. बेल्जियम युनिसेफच्या अध्यक्षा असलेल्या बेल्जियमच्या राणी क्वीन मथिल्दा यांनी यावेळी बालहक्कांसाठी भारतात युनिसेफतर्फे आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने मुलांसाठी पाणी, स्वच्छता, सुरक्षा, स्त्री सबलीकरण अशा उद्देशांचा समावेश होता.

आपण कोणत्याही देशात रहात असलो, तरी लहान मुलांचा आपण कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून बचाव करायला हवा. संयुक्त राष्ट्रांचा एक प्रतिनिधी म्हणून मी मुलांसाठी शिक्षण हक्काला सर्वाधिक महत्त्व देतो.

क्वीन मथिल्दा, बेल्जियमच्या राणी

महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आपण त्यासाठी पुढाकार घेण्याची हीच खरी वेळ आहे. आणि खेळामधून हे सर्वात चांगल्या प्रकारे होऊ शकतं.

वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू

या दौऱ्यादरम्यान क्वीन मथिल्दा यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. यावेळी, विशेषत: सुरक्षा, कौशल्याधारित प्रशिक्षण, मुलींची सुरक्षा, बालविवाह प्रतिबंध अशा मुद्द्यांवर त्यांनी मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.


हेही वाचा

17 वर्षांपासून मुलांना मोफत शिकवणारा अवलिया!

पुढील बातमी
इतर बातम्या