परप्रांतीय म्हणतात, मराठी माणूस दिलदार, सर्वेतून उघड

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

६० टक्क्यांहून अधिक अमराठी लोक म्हणतात की त्यांना स्थानिक ‘मराठी माणसे’ खूप चांगली वागणूक देतात. एवढेच नाही तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त मराठी लोकांना बाहेरचे लोक आपल्यासाठी धोका आहेत असे वाटत नाही. सी-व्होटर्सच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

१ मे रोजी सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यासाठी मुंबईतील सुमारे १,३०० रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि इतर राज्यात जन्मलेल्यांना समान प्रश्न विचारण्यात आले आहेत.

यामध्ये लोकांचे सर्वात आवडते नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत.

मुंबईतील ३५.२ टक्के अमराठी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या पसंतीसाठी निवडले आहे तर ३२.३ टक्के मराठी लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. या सर्वेक्षणानुसार दुसरे सर्वात प्रशंसनीय नेते बाळासाहेब ठाकरे आहेत, ज्यांना १५.३ टक्के अमराठी आणि १७.१ टक्के मराठी लोकांनी निवडले आहे.

जवळपास ११ टक्के अमराठी लोकांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पसंती दिली आहे तर फक्त ४ टक्के मराठी भाषिकांनी त्यांना पसंती दिली आहे, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मराठी आणि अमराठी दोघांनीही ‘पावभाजी’ हा त्यांचा आवडता पदार्थ म्हणून निवडला आहे. दोघांनीही मुंबईच्या सुरक्षेबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर मुंबईत सार्वजनिक वाहतूक ही गंभीर समस्या असल्याचे दोघांनी मान्य केले आहे.

बॉलीवूडमधील सर्वाधिक पसंतीच्या लोकांचा विचार केला तर २५ टक्के लोक अमिताभ बच्चन आणि २४ टक्के लोक अक्षय कुमारला पसंती देतात. आमिर, शाहरुख आणि सलमान खान या दिग्गजांपैकी कोणीही १० टक्क्यांच्या वर पोहोचलेले नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या