सचिन तेंडुलकरच्या मदतीनं शेतकऱ्याची मुलगी होणार गावातील पहिली डॉक्टर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

रत्नागिरी जिल्ह्यातील झर्ये गावातील दीप्ती विश्वासराव या मुलीच्या मदतीला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं मदतीचा हात दिला आहे. दीप्तीला गावातील पहिली डॉक्टर व्हायचं होतं. मात्र लहानपणापासूनच हुशार असलेल्या दीप्तीचे स्वप्न पूर्ण करण्यात आर्थिक अडचणी येत होत्या.

सचिन तेंडुलकरला याबाबत माहिती मिळाली आणि त्यानं तिला मदत करण्याचा संकल्प केला. सचिन तेंडुलकरने दीप्तीचे वैद्यकीय शिक्षण आणि राहण्याचा पूर्ण खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

दीप्ती दशरथ विश्वासराव हिनं शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसंच तिनं राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट देखील उत्तीर्ण केली. याच आधारे तिला अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला.

मात्र, महाविद्यालयाचं शुल्क, वसतिगृह आणि दुसरे खर्च आर्थिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकत नव्हते. दीप्तीची ही माहिती सोशल मीडियाद्वारे सचिन तेंडुलकरला मिळाली. सचिननं स्वयंसेवी संस्था ‘सेवा सहयोग फाउंडेशन’च्या माध्यमातून शिक्षणाचा पूर्ण खर्च उपलब्ध करून दिला आहे.

दीप्तीला लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन क्लास करण्यासाठी इंटरनेट जोडणीत प्रचंड अडचण येत असे. अशा वेळी नेटवर्क मिळवण्यासाठी ती कित्येक किमी पायपीट करत असे. कोकणातील दुर्गम गावात तिच्यापर्यंत पोहोचणे सोपं नसतानाही सचिननं स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांसह आवश्यक तेवढी आणि अगदी थोड्या वेळातच व्यवस्था केली.

सचिन तेंडुलकरच्या या मदतीमुळे दीप्ती आता तिच्या गावातील पहिली डॉक्टर होण्याचे पूर्ण करू शकणार आहे. शिक्षणाचा सर्व खर्च उपलब्ध करून दिल्यानं सचिनची मी आभारी असल्याचं दीप्ती म्हणाली. ती पुढेही हेही म्हणाली की, मी परिश्रम घेत शिक्षण पूर्ण करेन आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही मदत करेन, असा विश्वास मी सचिनला देत आहे.


हेही वाचा

महापुर: ज्या गणेशमूर्तींचं नुकसान झालं आहे त्या मूर्तिकारांना मिळणार मूर्ती

अंगारकी संकष्टी : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट

पुढील बातमी
इतर बातम्या