26/11 Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या गोळीबारा दरम्यान मुलगी झाली, नाव ठेवलं 'गोली'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं मुंबई हादरली होती. १३ वर्षांपूर्वी जेव्हा कामा हॉस्पिटलमध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचे साथीदार गोळीबार करत होते. त्याचवेळी हॉस्पीटलमध्ये एका मुलीनं जन्म घेतला.

या मुलीचं नाव गोली ठेवण्यात आलं. गोलीचे कुटुंबीय तिचा वाढदिवस साजरा करत नाहीत. या दिवशी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचं स्मरण करतात.

गोलीची आई विजू सांगतात, माझ्या प्रसूतीनंतर सीएसटी स्थानकातील महिला गोळीबाराबद्दल बोलत होत्या. मी आणखीनच घाबरले. जेव्हा मी माझ्या मुलीला पहिल्यांदा दूध पाजले आणि तिला पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला. मग सिस्टर आणि डॉक्टरांनी मला विचारले की विज तू काही खाल्ले आहेस की नाही?

मी म्हणाले काही खाल्ले नाही. मग त्यांनी मला एक सफरचंद खायला दिले आणि सांगितले की, ते खा आणि मुलीला दूध दे. गोळीबारातच तिचा जन्म झाल्याचं त्यांनी सांगितलं. तिचं नाव गोली ठेव असंही सांगिलतं. तेव्हापासून तिला सर्वजण गोली म्हणतात. बरेच लोक तिला AK-47 असंही म्हणतात.

विजू सांगतात, 'त्या दिवशी संध्याकाळी ७ वाजले होते. मला प्रसूती वेदना होऊ लागल्या. मी माझे पती श्याम लक्ष्मणराव यांच्यासोबत कामा हॉस्पिटलला निघालो. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी मला अॅडमिट करून माझ्या पतीला औषध आणायला पाठवले.

साडेनऊ वाजता वरच्या मजल्यावर दुसऱ्या वॉर्डात गेलो. हळूहळू वेदना वाढू लागल्या. बाहेर काय चालले आहे ते मला कळत नव्हते. काही वेळानं अचानक स्फोटाचा आवाज घुमू लागला.

विजू सांगतात की, तेव्हा मला वाटले की, भारत सामना जिंकल्यावर लोक फटाके फोडत असतील. तेवढ्यात पुन्हा गोळीबाराचा आवाज आला आणि डॉक्टर मला सोडून बाहेर पळाले. मग काय, गदारोळ सुरू झाला.

सगळे इकडे तिकडे धावू लागले. १५-२० जण वॉर्डात आले. सगळेच घाबरले. कुणी म्हणालं पडदा लाव. काही खिडक्या तर काही दरवाजे बंद होऊ लागले. तेव्हा कोणीतरी म्हणाले की विजूला लेबर वॉर्डमध्ये घेऊन जा.

विजू सांगतात, इथं गोळ्या चालल्या होत्या. मी घाबरले होते, खूप घाम येत होता. मला इच्छा असूनही माझ्या प्रसूती वेदनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. वेदना तर होणारच होत्या. बाहेर काहीतरी खूप धोकादायक घडत आहे हे मला माहीत होतं, त्यामुळे मी ओरडूही शकत नव्हते. मी कोणताही आवाज केला नाही.

स्वतःच्या आतल्या वेदना दाबल्या. काही वेळानं माझी मुलगी गोळ्यांच्या आवाजात जगात आली. नर्सनं बाळाचे वजन केले, नंतर बाळाला झोपवले. १०-१५ मिनिटांनी परिचारिका आली आणि तिनं विजूला खाली गादी ठेवून झोपायला सांगितलं, जेणेकरून वर गोळी लागू नये. मला पलंगाखाली झोपवलं. खोलीची लाईट बंद करण्यात आली.

मला माझा ५ वर्षाचा मुलगाही होता. त्या खोलीत अनेक महिला होत्या, ज्या CST स्थानकातून पळून आल्या होत्या. अनेक सिस्टर होत्या. मी एका दीदीचा हात पकडला आणि म्हणालो की, मला भीती वाटत आहे.

मी देवाचे नावघेत होते. आज माझा शेवटचा दिवस तर नसेल. देवाला स्मरण करून म्हणले, तूच रक्षणकर्ता आहेस आणि जन्म देणारा तूच आहेस.

गोलीचे वडील सांगतात, “डॉक्टरांनी मला जवळच्या हॉस्पिटलमधून काही औषधे आणायला पाठवले होते. लिफ्टजवळ पोहोचताच बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या. भारताच्या विजयाच्या आनंदात लोक फटाके फोडत आहेत असे मला आधी वाटले.

वॉचमनला सांगायला गेलो की, मी काही औषधं घ्यायला निघालोय आणि लवकरच परत येईन. पण लिफ्ट मला न घेता निघून गेली. त्यानंतर मी पायऱ्या चढू लागलो. वाटेत एक वेदनादायक दृश्य बघायला मिळाले. लिफ्टमनला गोळी लागली. त्याच्या पोटातून रक्त येत आहे. त्याचा मृत्यू झाला होता.

ते सांगतात, मी थोडं पुढे गेल्यावर पाहिलं की वॉचमनलाही गोळी लागली होती आणि त्याचाही मृत्यू झाला होता. मी घाबरलो, खूप घाबरलो. मी हळूच पायऱ्या चढून वर गेलो. मी सर्वांना सांगितले की बाहेर गोळीबार होत आहे.

व्हरांड्यात उपस्थित असलेल्या सर्वांना मी वॉर्डात जाण्यास सांगितले. दहशतवाद्यांना आत येण्यापासून रोखण्यासाठी लोकांनी दारासमोर अनेक पलंग टाकले होते. त्यानंतर मी खिडकीतून बाहेर काय होत आहे ते पाहत होतो.


हेही वाचा

२६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले मार्कोस कमांडो

26/11 Terrorist Attack : २६/११चे हिरो

पुढील बातमी
इतर बातम्या