मनपा शालेय कॅरम स्पर्धेत 156 खेळाडूंचा सहभाग

मुंबई - मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ सहकार्याने आयोजित क्रीडाप्रेमी स्व. नारायण आयरे स्मृती चषक मनपा शालेय विभाग 17 वर्षांखालील मुलांच्या कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद रुपेश पेंडसेने पटकाविले. धारावी येथील संत कक्कया मार्ग मनपा शाळेच्या सभागृहात झालेल्या कॅरम स्पर्धेमधील अन्य वयोगटातील अंतिम विजेते पूजा लालप्पा, सोहेल शेख, स्नेहा धाडसे तर अंतिम उपविजेते अफसर शेख, प्रणिता देवलकर, तौसीफ अन्सारी, अंबिका भंडारे ठरले.

विविध वयोगटामधील अंतिम सामन्यात 17 वर्षांखालील मुलींमध्ये पूजा लालप्पाने प्रणिता देवलकरचा 25-13 असा; 14 वर्षांखालील मुलांमध्ये सोहेल शेखने तौसीफ अन्सारीचा 25-11 असा आणि मुलींमध्ये स्नेहा धाडसेने अंबिका भंडारेचा 25-14 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. लहान गटामध्ये अन्सारी अली, आदीत्य दीपक, गुंजल वडेट्टी, मारिया अन्सारी तर मोठ्या गटामध्ये मसरूर शेख, नुरुद्दीन अन्सारी, खैरुन्निसा आणि शबनम शेख यांनी उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला.

156 खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या मोफत प्रवेशाच्या स्पर्धेला मनपा शालेय क्रीडा विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक रामेश्वर लोहे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांचे प्रमुख सहकार्य लाभले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या