सबज्युनियर बॅडमिंटन : मनाली परुळेकरची उपांत्यपूर्व फेरीत धडक

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

मुलुंड इथल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्पोर्टस काॅम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र सबज्युनियर राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या अार्या कोरगावकर अाणि मुंबई उपनगरच्या मनाली परुळेकर यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली अाहे. 

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत अार्याने पुण्याच्या सानिका पाटणकरविरुद्ध पहिला गेम गमावला. मात्र पुढील दोन्ही गेम जिंकून २२-२४, २१-१७, २१-१८ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मनाली हिलाही पहिल्या गेममध्ये हार पत्करावी लागली. मात्र पुढील दोन्ही गेम जिंकून तिने पुण्याच्या अारती चौघुलेचे अाव्हान १३-२१, २१-१६, २१-१८ असे मोडीत काढले.

अालिशा नाईकचा सहज विजय

मुलींच्या १३ वर्षांखालील गटात मुंबई उपनगरच्या अालिशा नाईक हिने नाशिकच्या वरदा एकांडे हिचा २१-१०, २१-१६ असा सहज पराभव केला. याच गटात ठाण्याची मधुमिता नारायण अाणि तानिका सिक्वेरा हिच्यासह मुंबईची नायशा भाटोये अाणि मुंबई उपनगरची सिया सिंग यांनी अापापले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली अाहे.

अोम गवंडीची सुरेख सुरुवात

मुलांच्या १३ वर्षांखालील गटात, नाशिकच्या अव्वल मानांकित प्रज्वल सोनावणेने रायगडच्या विश्व डोंगाचा पाडाव केला तर ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित अोम गवंडीने मुंबई उपनगरच्या भाव्या शाहला २१-५, २१-५ असे सहज पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


हेही वाचा -

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नील राॅयचा नवा विक्रम

रोहित शर्माची लंडनवारी धोक्यात, रहाणेच्या अाशा पल्लवित


पुढील बातमी
इतर बातम्या