कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या सत्रावर अनिश्चिततेचे सावट आहे. आयपीएलच्या १३ व्या सत्रावर महेंद्रसिंग धोनीचे टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून होते. तसे स्पष्ट संकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिले होते. पण, आता आयपीएलच होणार नाही, तर धोनीचे पुनरागमन कसं होईल? हा प्रश्न सर्वांना पडला असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) गुरुवारी अचानक धोनीची आठवण झाली. त्यांनी सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे.
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता अनेकदा वर्तवण्यात आल्या, परंतु त्या चुकीच्या ठरल्या. आयपीएलनंतर तो टीम इंडियात कमबॅक करेल, अशी आशा होती. पण, कोरोना व्हायरसमुळे तीही पूर्ण होईल अशी अपेक्षा फार कमी आहे. काही दिवसांपूर्वी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही धोनीने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, असे विधान केले होते. त्यावरून धोनीच्या नवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या आणि अजूनही त्या सुरूच आहेत. गुरुवारी बीसीसीआयने सोशल मीडियावर धोनीचा हसरा फोटो शेअर करताना आनंदी राहा.. अशी कॅप्शन दिली.