यश फडते, सान्या वत्सने जिंकले इंडियन क्लासिक ज्युनियर स्क्वाॅशचे जेतेपद

बाॅम्बे जिमखान्याच्या ग्लासबॅक स्क्वाॅश कोर्टवर रंगलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत १६ वर्षीय यश फडते याने अाणखी एका धमाकेदार कामगिरीचे प्रदर्शन करत मुंबईच्या चैतन्य शाह याला ११-८, ११-६, ९-११, ११-५ अशी धूळ चारून इंडियन क्लासिक ज्युनियर अोपन स्क्वाॅश स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. १९ वर्षांखालील मुलींमध्ये सान्या वत्स हिने अव्वल मानांकित अमिता गोंदी हिच्यावर ११-६, ९-११, ११-५, ११-२ अशी मात करत जेतेपदाला गवसणी घातली.

चैतन्यने केली निराशा

उपांत्य फेरीत अव्वल मानांकित अाणि भारताचा अग्रमानांकित खेळाडू तुषार शहानी याला अवघ्या चार गेममध्येच पराभूत केल्यामुळे चैतन्य शाहकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. तोच विजेतेपदाचा दावेदार समजला जात होता. मात्र चैतन्यने साफ निराशा केली. पहिल्या दोन गेममध्ये त्याची डाळ शिजलीच नाही. अखेर तिसऱ्या गेममध्ये कडवा प्रतिकार करून चैतन्यने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण यश फडतेने चौथा गेम जिंकून विजेतेपदावर मोहोर उमटवली.

मी १० वर्षांचा असल्यापासून चैतन्यविरुद्ध अंतिम सामने खेळलो अाहे. उपांत्य फेरीत त्याने अव्वल मानांकित तुषारला पराभूत केल्यामुळे मला कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागेल, याची कल्पना होती. मात्र सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवित गेल्यामुळे सर्व गोष्टी सोप्या होत गेल्या. चैतन्य दमल्याचा फायदा मी उठवला अाणि जेतेपद पटकावले.

- यश फडते, विजेता

सान्याची सहज बाजी

सान्या वत्स हिने पहिला गेम सहज जिंकून सामन्यात अाघाडी घेतली होती. त्यानंतर अमिता गोंदीनेही जोमाने खेळ करत पुढील गेम जिंकून बरोबरी साधली. मात्र तिसरा अाणि चौथा गेम जिंकून सान्याने विजेतेपद अापल्या नावावर केले. विजेत्या यश अाणि सान्याला प्रत्येकी ३४ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात अाले. उपविजेता चैतन्य अाणि अमिता प्रत्येकी २० हजारांचे मानकरी ठरले.


हेही वाचा -

चैतन्य शाह, यश फडते फायनलमध्ये भिडणार

अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?


पुढील बातमी
इतर बातम्या