समजा वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं आणि तुम्ही ते घरीच विसरलात तर? मग काय चांगला दंड भरावा लागणार. ड्रायव्हिंग लायसन्सचं काय घेऊन बसलात गरजेच्या वेळी तुम्ही कधी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घरी विसरलात तरी तुमची कामं अडतात. कितीही विनवण्या केल्या तरी ट्रॅफिक पोलीस काही ऐकत नाही. पण आता असं करण्याची गरज नाही. यावरच आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत.
डिजीलॉकर (DigiLocker) हे एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे. यात तुम्ही सर्व महत्वाची कागदपत्रं मोबाइलमध्ये डिजिटल स्वरूपात सुरक्षित सांभाळून ठेवू शकता. हे ॲप ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत खुद्द भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MeitY) यांनी बनवलं आहे. त्यामुळे तुमची माहिती चोरीला जाण्याचा अजिबात धोका नाही. तुम्ही अगदी निश्चितपणे याचा वापर करू शकता.
अनेकांना या अॅपबद्दल माहिती नसेल. सरकारतर्फे मिळालेली वेगवेगळी ओळखपत्रे, सर्टिफिकेट्स, महत्वाची कागदपत्रे इत्यादी डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाइल अथवा लॅपटॉपमध्ये एकाच ठिकाणी या ॲपमध्ये जतन करता येऊ शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हेईकल रजिस्ट्रेशन, सनद आणि वेळोवेळी मिळालेली सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे त्या त्या डिपार्टमेंटतर्फे या ॲपमध्ये सिंक्रोनाईज केली जाऊ शकतात.
भारत सरकारनं जेव्हा पेपरलेस यंत्रणा राबविण्याचा विचार केला तेव्हा या ॲपची संकल्पना समोर आली. २३ डिसेंबर २०१५ ला हे अॅप लाँच झालं. पण या ॲपला सरकारी मान्यता असल्यानं गरज असेल तेव्हा तुमची कागदपत्रे तुम्ही डिजिटल स्वरूपात सादर करू शकता. डिजीलॉकर अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर उपलब्ध आहे. सरकारी वेबसाईटच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १ कोटी ७० लाख लोकांनी डिजीलॉकर रजिस्ट्रेशन केलं आहे. आता तर रेल्वे सुद्धा या प्रकारे सादर केलेली सॉफ्ट कॉपी स्वीकारत आहे. त्यामुळे प्रवासात कागदपत्रं बाळगण्याची आणि ती गहाळ होण्याची अथवा चोरीला जाण्याची भीती नाही.
तुम्हाला प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. ॲप डाउनलोड झाल्यावर सुरुवातीला त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुमचा मोबाइल नंबर किंवा ई मेल हा युजर आयडी म्हणून वापरता येतो. त्यानंतर एक पासवर्ड सेट करावा लागतो. जो तुमचा हा सर्व डेटा सुरक्षित ठेवेल. अधिक सुरक्षेसाठी म्हणून आणखी एक चार अंकी पिन वापरण्याचासुद्धा पर्याय यात आहे. आता तुम्ही डिजीलॉकर वापरण्यास सज्ज झाला आहात. प्रत्येक डॉक्युमेंटसाठी पर्याय दिलेले आहेत त्यावर क्लिक करून संबंधीत डिपार्टमेंटकडून तुमची माहिती ॲपवर सेव्ह होते. यात तुम्ही स्वतः वेगवेगळे फोल्डर तयार करून तुमच्या सोयीनुसार कागदपत्रे त्यात ठेऊ शकता. वापरण्यास अत्यंत सोपे असलेले हे ॲप फारच उपयुक्त ठरते.
हेही वाचा