परळ टर्मिनसच्या कामासाठी १०० लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना सुखकर प्रवास करता येणार आहे. कारण मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे आता परळ स्थानकातून कल्याणच्या दिशेनं १६ उपनगरी फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. तसंच परळ  टर्मिनसचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी, २० आणि २७ जानेवारी रोजी दोन मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळं दादर स्थानकात प्रवाशांची होणारी गर्दी कमी होणार आहे.

काम अंतिम टप्प्यात

जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत परळ टर्मिनसचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी २० आणि २७ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लवकर काम पूर्ण होण्यासाठी २० जानेवारी रोजी तब्बल नऊ तासांचा ब्लॉक घेण्यात आहे. या दरम्यान सुमारे १०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार अाहेत. पुणे, नाशिकला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच, २७ जानेवारीला पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मेगाब्लॉकला सामोर जावं लागणार आहे.

गर्दीवर नियंत्रण

मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परळ स्थानकातून ठाणे, डोंबिवली, कल्याणच्या दिशेनं उपनगरी गाड्या सोडण्यात येणार आहेत. अशा एकूण १६ फेऱ्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेनं ३२ फेऱ्या सोडण्यात येत असून यातील १६ फेऱ्या परळ स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

सध्या परळ परिसरात असणाऱ्या सरकारी, खासगी कार्यालये, रुग्णालयांमुळे परळ स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळं या नागरिकांना सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणं परळ स्थानकातील प्रवासी जास्त असल्यामुळे धक्काबुक्की सहन करत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर परळ टर्मिनसची योजना रेल्वे बोर्डानं मंजूर केली होती.


हेही वाचा

मध्य रेल्वे मार्गावर मार्च महिन्याच्या अखेरीस धावणार २ एसी लोकल?

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक लोकल लवकरचं प्रवाशांच्या सेवेत


इतर बातम्या