बहुप्रतिक्षित पहिली एसी लोकल नाताळच्या मुहूर्तावर सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. २५ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पहिली एसी लोकल बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने धावली. रविवारी अंतिम चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर देशातील पहिल्या एसी लोकलला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे आता मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे.
सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस ही एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावेल. या लोकलच्या दररोज १२ फेऱ्या असतील. या १२ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या चर्चगेट ते विरार अशा असतील. ही जलद लोकल मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड (दोन्ही दिशेने) या स्थानकांवर थांबेल.
तर, ३ फेऱ्या चर्चगेट ते बोरीवली अशा चालवण्यात येतील. ही जलद लोकल मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे आणि अंधेरी (दोन्ही दिशेने) या स्थानकांवर थांबेल. तसेच उर्वरीत १ फेरी महालक्ष्मी ते बोरीवली अशी असेल. ही लोकल धिमी असून सर्व मार्गावर थांबेल.
या एसी लोकलचं तिकीट सध्याच्या फर्स्ट क्लासच्या १.३ पट असेल. पण सुरूवातीचे ६ महिने या लोकलचं तिकीट सध्याच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दराच्या १.२ पट असेल. त्यानुसार लोकलचं किमान भाडं ६० तर कमाल भाडं २०५ रुपये असेल, अशी माहिती मिळते.
सध्याच्या फर्स्ट क्लासच्या तिकिटांच्या तुलनेत एसी लोकलचं तिकीट ३० रुपयांनी महाग असेल. त्यानुसार, प्रवाशांना चर्चगेट-वांद्रे प्रवासासाठी ७० रुपये, चर्चगेट-बोरीवली आणि चर्चगेट-विरार प्रवासासाठी अनुक्रमे १६५ रुपये आणि २०५ रुपये खर्च करावे लागतील. या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असेल.