शताब्दीनंतर, आता राजधानीचं रुपही बदलणार

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेसनंतर आता राजधानी एक्स्प्रेसमध्येही अत्याधुनिक बदल करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयातील शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी स्वर्णप्रकल्प घोषित करण्यात आला. याआधी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक बदल करण्यात आले होते आणि आता राजधानी एक्स्प्रेसमध्येही असेच अत्याधुनिक बदल करण्यात आले आहेत.

राजधानीचं नवं रुप

राजधानी एक्सप्रेसच्या इंटेरिअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. राजधानी एक्स्प्रेसमधील सर्व डब्यांचा बाह्यभाग विशेष रंगाने रंगवण्यात आला आहे. त्यामुळे, या डब्ब्यांवर धूळ साचणार नाही आणि डबे अस्वच्छ दिसणार नाहीत. या ठिकाणी विशिष्ट पद्धतीच्या डिझायनर विनेलची जोड देण्यात आली आहे. प्रवेशद्वार, प्रसाधनगृहे, सीलिंग आदी ठिकाणीही रंगकाम करण्यात आलं आहे.

राजधानी एक्स्प्रेसच्या एकूण २३ बोगींना स्वर्ण प्रकल्पांतर्गत नवं रुप मिळालं आहे. यासोबतच रेल्वे प्रवासामध्ये देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा आणि सुरक्षेसंदर्भातील सर्व माहिती फलकावर देण्यात आली आहे. यासह महाराष्ट्र आणि गुजरातमधील सांस्कृतिक वारसा आदींची चित्रेही लावण्यात आली आहेत. अशा विविध बदलांसाठी प्रत्येक गाडीमागे सुमारे ५० लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे.

उत्तम प्रवासी सेवा

प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली आहे. प्रवाशांना जेवणासाठी विमानातील फूड ट्रॉलीप्रमाणे देण्यात येणारी एक्स्प्रेसमध्येही देण्यात आली आहे. या सुविधांमुळे प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यास साहाय्य होईल, असं मत पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी व्यक्त केलं आहे.

स्वर्ण प्रकल्पांतर्गत राजधानीसह ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्ये देखील याप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. १०० राजधानी बोगीत हे बदल करण्यात येईल. गुरुवारपासून पहिली अत्याधुनिक राजधानी एक्स्प्रेस सेवेत दाखल झाली असून मार्चपर्यंत राजधानीच्या ५ बोगींमध्ये अत्याधुनिक बदल करण्यात येतील.

पुढील बातमी
इतर बातम्या