खाद्यपदार्थात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार एअर इंडियाच्या विमानात घडला आहे. विमानानं प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला खाद्यपदार्थामध्ये झुरळ आढळल्यानं एकच खळबळ उडाली. त्यामुळे एअर इंडियाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. एका प्रवाशानं आपल्याला आलेला अनुभव शनिवारी सोशल मिडियावर शेअर केल्यानं हा प्रकार उघडकीस आला. यानंतर नेटकऱ्यांनी एअर इंडियावर टिकेची झोड उठवली. अखेर घडल्या प्रकरणाची दखल घेत एअर इंडियानं ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे.
व्यवसायिक कामानिमित्त रोहित सिंह चौहान हे शनिवारी एअर इंडियाच्या विमानानं भोपाळ-मुंबई असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चौहान यांनी विमानातील एअर होस्टेसकडे इडली-वडा-सांबार मागवलं. ते खात असताना चौहान यांना त्यात झुरळ असल्याचं दिसलं. ताबडतोब त्यांनी ही बाब विमानातील एअर होस्टेसच्या निदर्शनास आणून दिली. मात्र हा प्रकार विमानातील एअर होस्टेस यांनी फारसा गांभीर्यानं न घेतल्यामुळे चौहान यांनी आपल्याला आलेला वाईट अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला. चौहान यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना आलेले अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत एअर इंडिया विमान कंपनीला टॅग केलं.
चौहान यांनी सोशल मिडियावर पोल-खोल केल्यानंतर घडल्या प्रकाराची दखल घेत एअर इंडियानं ट्विट केलं की, “घडलेल्या प्रकाराबाबत क्षमस्व आहोत, प्रवाशांना प्रवासाचा आनंद मिळावा हाच आमचा सर्वतोपरी हेतू असतो'. त्यानंतरही सोशल मीडियावरून अनेकांनी एअर इंडियाच्या कार्यपद्धतीवर टिका केली. नेटकऱ्यांच्या संतापाची गांभीर्यानं दखल घेत एअर इंडियाच्या वतीने संबंधित खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यात आली असल्याचं कळतं.