जनतेनं बेस्टच्या पाठीशी उभं राहावे, 'आमची मुंबई, आमची बेस्ट'चे प्रवाशांना आवाहन

खासगी गाड्यांच्या तुलनेत मुंबईत कमी तिकीट दरात सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळं आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आणि संबंधीत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संघटनेतर्फे शुक्रवार १ मार्च रोजी जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं.  बेस्ट सध्या अडचणीत असून बेस्ट कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. बेस्ट बंद झाली तर खासगी वाहनांनी प्रवास करणं प्रवाशांना परवडणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं बेस्टच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून बेस्ट वाचवावी, असं आवाहन यावेळी ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ संघटनेतर्फे करण्यात आलं.  

प्रवाशांच्या तक्रारी

बस थांब्यावर बस उशीरानं येत असल्यानं जास्त वेळ बसची वाट पाहत राहावी लागते. बस थांब्यावरील अनधिकृत पार्किंग, बसमधील काही चालक व वाहकांसोबत प्रवाशांची होणारी अरेरावी, तसंच सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद, आवश्यक त्या मार्गावर बस नसणे, बसचे वाढलेले भाडे अशाप्रकारच्या अनेक तक्रारी प्रवाशांनी या जनसुनावणीवेळी केल्या. त्याशिवाय बंद झालेले जुने मार्ग पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

पालिकेचा नकार

बेस्ट उपक्रमाची होणारी तूट महापालिकेने भरून काढावी. तसंच बेस्टकडे जास्तीचे पैसे आले तर ते पालिकेला द्यावेत अशी तरतूद महापालिकेच्या अधिनियमात आहे. परंतू, या अधिनियमानुसार पालिका बेस्टची जबाबदारी घ्यायलाच तयार नसल्याचे बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय महापालिकेनं अर्थसंकल्पात कोस्टल रोडकरीता दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मग पालिकेकडे बेस्ट चालवण्यासाठी पैसे का नाहीत, असा प्रश्न यावेळी संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला. तसंच बेस्ट समिती राजकीय नेत्यांकडे असल्याने बेस्टच्या खासगीकरणाचा डाव रचण्यात येत आहे. बेस्टचं खासगीकरणं झाल्यास बेस्टचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणार नाही. त्यामुळे जनतेने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊन पालिकेवर दबाव आणावा, असंही आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलं आहे.

प्रवाशांनी सुचवलेले उपाय

  • खासगी वाहन खरेदी करतेवेळी ‘सार्वजनिक वाहतूक कर’ लावण्यात यावा. त्यातून जमा झालेली रक्कम बेस्ट प्रशासनाला द्यावी.
  • बस थांब्यांवर बसचे वेळापत्रक आणि मार्गिकांची यादी लावण्यात यावी.
  • ६ पदरी रस्त्यांमध्ये १ मार्गिका बेस्टसाठी राखीव ठेवण्यात यावी, त्यामुळे बस वाहतूूक कोंडीत अडकणार नाही.
  • ४ पदरी रस्त्यांमधील १ मार्गिका गर्दीच्या वेळी बेस्टसाठी राखीव ठेवण्यात यावी. 
  • महिलांसाठी विशेष बस सेवा चालवण्यात यावी.
  • खराब झालेल्या बस थांब्यांची स्थिती सुधारावी.
  • प्रत्येक घरामागे एक वाहन असा कायदा करून खासगी वाहनांवर नियंत्रण आणावे. 


हेही वाचा -

प्राण्यांच्या डोळ्यांवरील उपचारासाठी मुंबईत पहिले 'आय स्पेशलिस्ट हॉस्पिटल' सुरू

पालिका क्षेत्रात २११ बोगस शाळा


पुढील बातमी
इतर बातम्या