परळ स्थानकातील गर्डर वेळेआधीच पूर्ण, मध्य रेल्वेचा ८ तासांचा ब्लॉक यशस्वी

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी रविवार १८ फेब्रुवारीला ८ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉक दरम्यान परळ स्थानकांत दुसऱ्या टप्प्यातील गर्डर टाकण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. या ब्लॉक दरम्यान लष्कराने एकूण ९ गर्डर उभारले. या वेळी मध्य रेल्वेने २५० टन वजनी क्रेन, एक २०० टन वजनी क्रेन आणि २५ टन वजनी क्षमता असलेल्या २ क्रेन्सचा वापर केला. शिवाय, या कामासाठी रेल्वेचे १२५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

परळ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ मधील नवीन पुलावर १२ मीटर रुंदीच्या पुलासाठी ९ गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकच्या वेळेआधीच हे गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती 'मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी' यांनी दिली.

सकाळी ८.३० ते ४.३० असा हा ब्लॉक घेण्यात आला. पण, ब्लॉकच्या वेळेच्या आधीच हे काम पूर्ण झाले आहे. परळ स्थानकातील पादचारी पूलासाठी दुसऱ्यांदा गर्डर टाकण्यात आला आहे. हे काम यशस्वीपणे झालं आहे. त्यामुळे आता अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील सेवा दुपारी ३.२३ च्या दरम्यान सुरू झाल्या आहेत.

- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावरून वळवण्यात आली होती. तर, अप मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावरून चालवण्यात आल्या. तर, लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर स्थानकात थांबाच दिला गेला नव्हता.

पुढील बातमी
इतर बातम्या