मध्य रेल्वेवर मोटरमन्सची कमतरता, अनेक फेऱ्या रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

मध्य रेल्वेवर नेहमीच काही ना काही तांत्रिक बिघाड होऊन गाड्या रद्द होत असल्याने 'रोज मरे त्याला कोण रडे' ही म्हण गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेसाठी सातत्याने वापरली जात आहे. त्यातच मध्य रेल्वे मार्गावरील लोकल हाकणाऱ्या मोटरमन्सनी ओव्हर टाइम करण्यास नकार दिल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण गेल्या ४ ते ५ दिवसांमध्ये मोटरमन्सच्या अपुऱ्या संख्येमुळे ४० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

आणखी त्रास सहन करा

पुढील काही दिवस तरी मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या रद्द होण्याचं सत्र सुरूच राहणार आहे. मध्य रेल्वेला ८९८ मोटरमन्सची गरज असताना केवळ ६९० मोटरमन्स मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. म्हणजेच मोटरमनच्या २० टक्के जागा रिक्त आहेत. एकीकडे ही रिक्त पदं भरली जात नसून दुसरीकडे कार्यरत मोटरमन्सनी अतिरिक्त काम करण्यास अर्थात ओव्हरटाइम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं मध्य रेल्वेवर चक्क फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

कधी किती फेऱ्या रद्द?

ही पद लवकर भरली गेली नाही तर मध्य रेल्वेला आणि परिणामी प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २५ मे ला मेन लाइनवरील १०, २६ मे ला २ तर २७ मे ला मध्य रेल्वेनं मेन लाइनवरील १०, हार्बर लाइनवरील १४ लोकल फेऱ्या रद्द केल्या. तर २८ मे ला ५ आणि २९ मे ला तीन फेऱ्या रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा-

'त्या' १३ धोकादायक पादचारी पुलांना सुरक्षा कवच

जखमी रेल्वे प्रवाशांचा वाली कोण?


पुढील बातमी
इतर बातम्या