मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावरून राणे कुटुंबाकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. स्वत: नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.
तसंच सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्याविषयी ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यांच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
तसंच दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोपही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचं कळालं, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. हे ट्विट राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ‘महत्वाची बातमी’ असे म्हणत केलं आहे.
तसंच ईडीची नोटीस आल्यावर विनायक राऊत आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे.
पुढील काही दिवसांत होणाऱ्या बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेनं नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा