दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट; मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा थांबवणार

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी दिल्लीत कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार सतर्कता बाळगत दिल्लीशी तूर्त संपर्क तोडण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.

दिली-मुंबई विमानसेवा आणि रेल्वेसेवा पुढचे काही दिवस बंद ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली-मुंबई विमानसेवा तसंच रेल्वेसेवा बंद ठेवता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसा प्रस्तावही असून तूर्त त्यावर केवळ चर्चा सुरू आहे.

सुरुवातीला मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता. मुंबई देशातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरली होती. हे संकट हळूहळू दूर होत असताना व स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली असताना दिल्लीत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मुंबईकरांचीही धाकधूक वाढली आहे. त्यात आधीच दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची दुसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली जात आहेत. त्यातूनच दिल्ली-मुंबई प्रवास तूर्त बंद केला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

राज्य सरकारसोबतच रेल्वे, नागरी उड्डाण विभाग यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या