थर्टी फर्स्टसाठी गोव्याला पोहोचा सुसाट, महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन म्हटलं, की मुंबईकरांची पहिली पसंती असते ती गोव्याला! त्यामुळेच दरवर्षी थर्टी फर्स्टला गोव्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी असते. मुंबई-गोवा महामार्गावर ३१ डिसेंबरच्या दोन-तीन दिवस आधी वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करत गोव्याला पोहोचावं लागतं. यंदा मात्र गोव्यात थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी जाणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुकर आणि सुसाट होण्याची शक्यता आहे.

तीन दिवस वाहतूक सुसाट

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २९ ते ३१ डिसेंबर अशा तीन दिवसांसाठी महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गोव्याला सेलिब्रेशनसाठी रस्ते मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या, तसेच पर्यटकांचा प्रवास सुकर व्हावा यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिल्याचे समजते आहे. गोवा असो वा कोकण, पर्यटकांची समुद्र किनारी थर्टी फर्स्टच्या दिवशी मोठी गर्दी असते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर सेलिब्रेशन करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक पथकही तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शिवसेनेचं धरणे आंदोलन

पुढील बातमी
इतर बातम्या