IRCTC ची पहिली क्रूझ सेवा १८ सप्टेंबरपासून सुरू होणार, 'या' ठिकाणांची करा भ्रमंती

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) आता पर्यटकांचा प्रवास रोमांचक करण्यासाठी नवीन सेवा सुरू करणार आहे. देशात प्रथमच, IRCTC खासगी कंपनी Cordelia Cruises या लक्झरी क्रूझ सेवांच्या सहकार्यानं क्रूझ सेवा सुरू करणार आहे. पहिली क्रूझ १८ सप्टेंबरला मुंबईहून गोव्याला जाईल. त्याची बुकिंग IRCTC च्या वेबसाईटवरून सुरू झाली आहे.

IRCTC च्या मते, IRCTC नं भारतातील पहिल्या स्वदेशी लक्झरी क्रूझच्या जाहिरात आणि मार्केटिंगसाठी M/s Waterways Leisure Tourism Pvt Ltd द्वारे संचालित Cordelia Cruises सह करार केला आहे. क्रूझनं प्रवाशांना स्टाईलिश, आलिशान आणि आरामदायक अशी सेवा दिली आहे. या क्रूझमध्ये सुमारे 2 हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

क्रूझमुळे लोकांना देशातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणं जशी की गोवा, दीव, लक्षद्वीप, कोची आणि श्रीलंकन पर्यटन स्थळांना भेट देता येईल. कॉर्डेलिया क्रूझ १८ सप्टेंबर रोजी आपली पहिली यात्रा सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात ही क्रूझ त्याच्या बेस स्टेशन मुंबईहून निघेल.

२०२२ पासून, क्रूझचे बेस स्टेशन चेन्नईला हलवले जाईल. यानंतर, पर्यटक कोलंबो, गल्ले, त्रिकोनामाली आणि जाफना सारख्या श्रीलंकेच्या विविध भागात जाऊ शकतील.

IRCTC नुसार, क्रूझ भाड्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला मुंबई ते गोवा या दोन रात्रीच्या प्रवासासाठी १७ हजार ८७७ रुपये मोजावे लागतील. तर समुद्राच्या दिशेनं असलेल्या खोलीसाठी, एका व्यक्तीला मुंबई ते गोवा या दोन रात्रीच्या दौऱ्यासाठी २५ हजार ४८८ रुपये मोजावे लागतील.

याशिवाय, सी फेसिंग व्ह्यू असलेल्या बाल्कनी रूमसाठी, मुंबई ते गोवा या दोन रात्रीच्या दौऱ्यासाठी एका व्यक्तीला ३१ हजार ५०६ रुपये द्यावे लागतील. पंचतारांकित हॉटेल प्रमाणे, क्रूझमध्ये प्रवास करणारे प्रवासी देखील जलतरण तलाव, बार, ओपन थिएटर आणि जिमचा आनंद घेऊ शकतील.

IRCTC नं क्रूझमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. ज्या प्रवाशांना कोरोना लस मिळाली आहे तेच या क्रूझमध्ये प्रवास करू शकतील. तसंच, क्रूझनं प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट ७२ तास अगोदर घेऊन जावे लागेल.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने क्रूझमधील सर्व क्रू मेंबर्सनाही लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, प्रत्येकाची आरोग्य तपासणी देखील दररोज केली जाईल. क्रूझ लोकांच्या सोयीसाठी वैद्यकीय टीम देखील तैनात केली जाईल.


हेही वाचा

बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणकडे रवाना

प्रवाशांना बेस्टचे तिकीट आता घरबसल्या मिळणार

पुढील बातमी
इतर बातम्या