'त्याला' चालत्या ट्रेनमधून खेचून 'टीसी' ने वाचवले प्राण!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

यूपीत राहणाऱ्या संदीप सोनकर या २० वर्षांच्या तरूणाचे कुटुंबिय आयुष्यभर कल्याणचे तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचे ऋणी राहतील. कारण त्यांनी कामच तसं केलं आहे. बेफिकीरीने गाडी पकडणारा संदीप शुक्रवारी आपल्या जीवाला मुकला असता, जर चव्हाण वेळीच आले नसते.

नेमकं काय झालं?

कल्याण स्थानकांत सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी नेहमीप्रमाणे पुष्पक एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर दाखल झाली. ही ट्रेन संदीपला पकडायची होती. तरीही ट्रेन सुरू होईपर्यंत तो खालीच थांबला. संदीपने ट्रेन सुटल्यावर ती पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र, ट्रेन पकडत असताना त्याने हाताने दरवाजाचं हॅण्डल धरलं, तरी त्याचे पाय प्लॅटफॉर्मवरच राहिले.

'असा' वाचवला जीव

हा सर्व प्रसंग प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेले तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत लटकत असलेल्या संदीपला चालत्या ट्रेनमधून खाली खेचलं आणि त्याचे प्राण वाचवले.

संदीप लखनऊला त्या ट्रेनमधून जाणार होता. पण, चालत्या ट्रेनमध्ये चढल्यामुळे त्याचं अर्ध शरीर ट्रेनच्या बाहेर लटकलेलं होतं. वेळीच प्रसंगावधन राखत शशिकांत चव्हाण यांनी त्याचे प्राण वाचवले.

सकाळी ड्युटीवरुन परतत असताना नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवर आलो. प्लॅटफॉर्मवर एक्स्प्रेस आली. संदीप चालत्या गाडीत चढला पण, तो डबा रिझर्व्हेशनचा होता. तो बाहेर लटकतच होता. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्याला खाली खेचलं.

- शशिकांत चव्हाण, तिकीट निरीक्षक, कल्याण

पुढील बातमी
इतर बातम्या