प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुर्घटनांचे सत्र सुरूच

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं अद्यापही रेल्वेसेवा पूर्णपणे सुरू झाली नसली तरी प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं रेल्वे अपघातात प्रवासी दगावण्याचे सत्र चालूच आहे. गेल्या वर्षभरात ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे दुर्घटनेत १४१ प्रवाशांनी जीव गमावला असून ५६ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १२८ पुरुष तर १३ महिला प्रवाशांचा समावेश आहे.

उपनगरीय रेल्वेसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी केव्हा सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता आपत्कालीन कर्मचारी आणि महिलांना मर्यादित वेळेत प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे स्थानकात थोडीबहुत प्रवाशांची वर्दळ दिसते.

ठाणे स्थानकात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत रेल्वेतून चढताना आणि उतरताना प्रवाशांची धांदल दिसून येते, तर दुसरीकडे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र, या धावपळीत अनेक प्रवाशांना प्राण गमवावा लागतो. ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते डिसेंबर, २०२० या वर्षात १२८ पुरुष आणि १३ महिला असा १४१ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ठाणे ते दिवा पुढे तळोजा तर हार्बर मार्गावर ठाणे ते ऐरोली या स्थानकांदरम्यान ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याची हद्द आहे. वर्षभरात या मार्गावर सरासरी ३०० ते ३२५ प्रवाशांचा मृत्यू होतो. यावर्षी लॉकडाउनमुळे ही संख्या निम्म्याहून कमी असली तरी बहुतांश प्रवासी स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावतात.

पुढील बातमी
इतर बातम्या