एकाच वेळी जुळ्या बोगद्यातून दोन टीबीएम मशीन पडल्या बाहेर

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ हा भुयारी मेट्रो मार्ग मुंबईकरांचा प्रवास भविष्यात सुकर करणार आहेच, पण त्याचवेळी हा प्रकल्प म्हणजे तंत्रज्ञानाचं अद्भूत नमुना मुंबईकरांसमोर उभा करत आहे. मुंबईच्या पोटाखाली मेट्रो-३ चं किती तरी मोठं आणि अद्भुत काम चाललं असून ब्रेक थ्रुच्या अर्थात भुयारी मार्ग खोदून टीबीएम मशीन बाहेर काढण्याच्या प्रक्रियेतून या कामाची नक्कीच कल्पना येते. आतापर्यंत दोन ब्रेक थ्रु यशस्वी करत दोन टीबीएम मशीन बाहेर पडली आहेत. आता त्यापुढं जात एका वेळी जुळ्या बोगद्यातून दोन टीबीएम मशीन यशस्वीपणे पार पडल्या असून मेट्रो-३ च्या कामातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

१७ टीबीएम आणि ५२ किमीचा भुयारी मार्ग!

मेट्रो-३ च्या भुयारी मार्गासाठी टनेल बोअरिंग मशीन या तंत्रज्ञानाचा वापर मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)कडून करण्यात येत आहे. त्यानुसार मेट्रो-३ च्या ७ ठिकाणच्या साईटवरील २५ ते ३० मीटर खोल विहिरींमध्ये १७ टीबीएम मशिन सोडण्यात आल्या आहेत. या टीबीएम मशीन मुंबईच्या पोटात शिरून दगड फोडत, माती काढत मेट्रो-३ साठी भुयारी मार्ग तयार करत आहेत. साधारण दोन वर्षानंतर ५२ किमीच्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण करत १७ ही टीबीएम मशिन बाहेर येणार आहेत. त्यानुसार सध्या काही किलो मीटरचं काम पूर्ण करत आतापर्यंत ४ टीबीएम मशीन बाहेर आल्या आहेत.

४ टीबीएमचं ब्रेक थ्रु यशस्वी

सर्वात आधी वैनगंगा हे टीबीएम मशीन २४ सप्टेंबर २०१८ ला पाली मैदान ते विमानतळ असा १.२६ किमीचा भुयारी मार्ग खोदून यशस्वीपणे बाहेर पडलं. त्यानंतर सारीपुत ते सिप्झ हे ५६७ मीटरचा बोगदा खोदत २६ डिसेंबरला दुसरं टीबीएम मशीन सिप्झ साईटवरून बाहेर पडलं आहे. तर गुरूवारी (३१ जानेवारी) एकाच वेळी दोन टीबीएम मशीन बाहेर पडल्या आहेत. माहीम, नयानगर येथील लाॅचिंग शाफ्ट अर्थात विहिरीमधून सोडण्यात आलेलं कृष्णा-१ आणि कृष्णा-२ अशी ही दोन टीबीएम मशीन आहेत. या दोन्ही टीबीएम २४९० मीटरच्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण करून गुरूवारी सकाळी दादर, शिवसेनाभवन येथून बाहेर पडल्या आहेत. कृष्णा-१ हे टीबीएम २१ सप्टेंबर २०१७ ला तर कृष्णा-२ हे १८ आॅक्टोबर २०१७ ला मुंबईच्या पोटात शिरलं होतं. चार महिन्यांनंतर मुंबईच्या पोटात कालवाकालव करून या दोन्ही टीबीएमनं आपलं ब्रेक थ्रू अखेर यशस्वी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही टीबीएमने दिवसाला सरासरी १० ते १२ मीटरचं भुयारीकरण केलं आहे.

१८ किमीपेक्षा अधिक भुयारी मार्ग पूर्ण

एकाच वेळेला जुळ्या बोगद्यामधून दोन टीबीएम मशीन यशस्वीरित्या बाहेर काढणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. हे आव्हान आज आम्ही यशस्वीपणे पेललं आहे. याचं संपुर्ण श्रेय आमच्या टीमला जातं असं म्हणत एमएमआरसीच्या व्यवस्थापकिय संचालिका अश्विनी भिडे यांनी या कामाचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी ३२.५ किमी मार्गाच्या मेट्रो-३ प्रकल्पात ५२ किमीचा भुयारी मार्ग खोदला जाणार असून त्यातील आतापर्यंत १८ किमीपेक्षा अधिक भुयारी मार्गाचं काम झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.


हेही वाचा -

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी शनिवार-रविवारी २०५ लोकल फेऱ्या रद्द

मेट्रो-१ च्या स्टोअर व्हॅल्यू पास स्मार्टकार्डधारकांना मिळणार कॅशबॅक


पुढील बातमी
इतर बातम्या