मोनोचा दुसरा टप्पा रखडला, एल अँण्ड टी, स्कोमीला दिवसाला साडेसात लाखांचा दंड

वडाळा ते जेकब सर्कल या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन हा टप्पा २०११ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र २०१८ उजाडलं तरी हे काम पूर्ण झालेलं नाही. एकीकडे चेंबूर ते वडाळा मोनो सेवा आगीमुळे बंद आहे तर दुसरीकडे वडाळा ते जेकब सर्कल मोनो मार्ग रखडला आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने मोनो प्रकल्प रावबणारे कंत्राटदार एल अँण्ड टी आणि स्कोमी कंपनीविरोधात १ जानेवारी २०१८ पासून दिवसाला साडे सात लाख रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरूवात केल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.

संथ कामामुळेच

एकूण १९.५४ किमी लांबीच्या चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्गााच्या कामाला २००८ मध्ये सुरूवात झाली. चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते जेकब सर्कल अशा दोन टप्प्यांमध्ये हे काम हाती घेण्यात आलं. त्यानुसार पहिला टप्पा डिसेंबर २०१० मध्ये, तर दुसरा टप्पा मे २०११ मध्ये पूर्ण करत मोनो सेवेत दाखल होणं अपेक्षित होते. पण हे दोन्ही टप्पे रखडले. कंत्राटदारांकडून संथगतीने काम सुरू असल्याने दोन्ही टप्पे रखडले. पहिला टप्पा २०१० एेवजी २०१४ मध्ये पूर्ण झाला, तर दुसऱ्या टप्प्याची अजूनही प्रतिक्षाच आहे.

एमएमआरडीएचा दणका

या दोन्ही टप्प्याचं काम रखडवल्याने, कामास विलंब केल्याने एमएमआरडीएला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याचं म्हणत आता एमएमआरडीएने कंत्राटदाराला धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून १ जानेवारी २०१८ पासून प्रत्येक दिवसासाठी साडे सात लाख रुपये असा विलंब शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्पाचं काम पूर्ण करत जोपर्यंत प्रकल्प सेवेत दाखल होत नाही तोपर्यंत दिवसाला साडे सात लाख रुपये एल अँण्ड टी-स्कोमीला भरावे लागणार आहेत.


हेही वाचा-

मोनो असुरक्षित! अग्निशमन दलाचे ताशेरे, सुचवल्या शिफारशी


पुढील बातमी
इतर बातम्या