एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, आता रेल्वेप्रमाणं एसटीचा प्रवास देखील कॅशलेस होणार आहे. एसटी प्रवासासाठी प्रवाशांना स्मार्ट कार्डाचा वापर करता येणार आहे. मुंबईतील लोकल रेल्वेच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असणार आहे. त्यामुळं एसटी प्रवासादरम्यान स्मार्ट कार्डाचा वापर करत प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील गोकुळदास तेजपाल सभागृहात शनिवारी एसटीचा ७१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते या स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याशिवाय या कार्यक्रमात रावते यांनी प्रवाशांसाठी तसंच, एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या.
मुंबईतील लोकल रेल्वेच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचं स्मार्ट कार्ड असणार आहे. स्मार्ट कार्डची किंमत ५० रुपये असून सुरुवातीला प्रवाशांना ३०० रुपयांचे रिचार्ज करावं लागणार आहे. त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत ५ हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येणार आहे. हे कार्ड प्रवाशांव्यतिरिक्त कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला एसटीमधून हे कार्ड स्वाइप करून प्रवास करया येणार आहे. त्याचप्रमाणं एसटी प्रवासाशिवाय शॉपिंगसाठी देखील या कार्डाचा वापर करता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता एसटीचं तिकीट काढणं आणखीनच सोपं होणार आहे.
८०० कोटींची बचत
सध्यस्थितीत एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांसाठी इंधनाचा वापर केला जात असून, इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं 'येत्या काळात एसटीच्या सर्व गाड्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस)वर चालविण्यात येणार आह. यामुळं एसटीची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार असून प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल', अशी माहिती मंत्री रावते यांनी दिली.
हेही वाचा -
टॅक्सीचं किमान भाडं ३० रुपये करण्याची टॅक्सीमेन्स युनियनची मागणी