सीएसएमटी-पनवेल उन्नत मार्गाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. मागील १० वर्षांपासून चर्चेत असलेल्या सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्गासाठी एका खासगी कंपनीनं पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडं पाठविण्यात आला असून चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) देण्यात आली. सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग झाल्यास सध्याचा ७५ मिनिटांचा प्रवास कालावधी ४५ मिनिटावर येणार आहे.
उन्नत प्रकल्प खासगी कंपनीमार्फत उभारतानाच लोकलही याच कंपनीमार्फत चालवण्याचं नियोजन आहे. हा मार्ग नवी मुंबई विमानतळालाही जोडण्यात येणार आहे. परंतु, प्रकल्पाच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ‘एमयुटीपी-३ ए’ अंतर्गत एमआरव्हीसीकडून प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
एमयुटीपी प्रकल्प राबविताना राज्य सरकारकडूनही निधी प्राप्त होतो. त्यामुळं उन्नत प्रकल्पासाठी पुढाकार घेतलेल्या खासगी कंपनीबाबत राज्य सरकारशीही चर्चा केली जात असल्याची माहिती मिळते. रेल्वे मंडळाकडेही चर्चा होत असून मंजुरी मिळाली तर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
नुकतंच पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्ग यासह विरार ते डहाणू चौपदरीकरण इत्यादी एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना ३ हजार ५०० कोटी रुपयांचे आर्थिक बळ मिळणार आहे. एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेनं (एआयआयबी) कर्ज मंजूर केलं आहे.
हेही वाचा -
भविष्यात रेल्वे प्रवाशांना पनवेल ते कर्जत प्रवास करणं शक्य होणार
सामान्य रुग्णांचे महापालिका रुग्णालयांमध्ये हाल