रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई - रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेमार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात धीम्या लोकल बोरिवलीपासून वसई रोड/ विरारपर्यंत जलदमार्गावर वळवण्यात येतील.

मध्य रेल्वेच्या शेलू ते कर्जत स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या काळात लोकल बदलापूर आणि अंबरनाथपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वेमार्गावरील नेरूळ ते पनवेल दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. नेरूळ ते पनवेल-बेलापूर दरम्यान सकाळी 11.01 ते 4.26 दरम्यान आणि पनवेल-बेलापूर ते सीएसटी दरम्यान सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 दरम्यान लोकलसेवा पूर्णपणे बंद असेल. पनवेल ते अंधेरी सेवाही चालवण्यात येणार नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या