मुंबई - गोवा तेजस एक्सप्रेस १० जुलैपासून पुन्हा सुरू

कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेली मुंबई-करमाळी (गोवा) तेजस एक्स्प्रेस (Mumbai-Karmali (Goa) Tejas Express) आता पुन्हा सुरू होणार आहे. तेजस एक्स्प्रेस १० जुलैपासून सुरू होत असल्याचं कोकण रेल्वेने सांगितलं आहे. 

याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२११९ मुंबई सीएसएमटी-करमाळी सीएसएमटीहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ५.५० वाजता सुटेल. ही ट्रेन करमाळीला सायंकाळी ४ वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने ट्रेन क्रमांक ०२१२० बुधवारी, शुक्रवार आणि रविवारी दुपारी  करमाळी येथून सुटेल आणि रात्री ११.१५ वाजता मुंबईला पोहोचेल. 

याशिवाय कोकण रेल्वे १० जुलैपासून ०१२२३/०१२२४ एलटीटी-एर्नाकुलम जन दुरंतो सुपरफास्ट स्पेशल ही ट्रेन पुन्हा सुरू करणार आहे. ह्या ट्रेनमधील सर्व आसने आरक्षीत असणार आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मुंबई - पुणे डेक्कन क्वीन,  राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-नाशिक (mumbai-nashik) पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत. 

मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन २६ तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक झाला आहे. 

मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता सुटेल, ती सकाळी ११.०५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. पुण्यातून ही गाडी दर दिवशी दुपारी ३.१५ वाजता सुटून संध्याकाळी ७.०५ वाजता मुंबईत पोहोचेल. 

प्रवासासह परिसरातील निसर्गाचा प्रवाशांना पुरेपूर आनंद देण्याच्या दृष्टीने रेल्वेने विस्टाडोम डब्यांची संकल्पना आणली आहे. सध्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला अशा प्रकारचा डबा जोडण्यात येत आहे. त्यातून कोकण आणि गोव्यापर्यंतच्या निसर्गाची अनुभूती प्रवाशांना मिळते आहे.

व्हिस्टाडोम कोच ४० सीटर ३६० डिग्री व्ह्यू कोच आहे, ज्याला काचेचे छत आहे. या काचेच्या छतामुळे प्रवाशांना बाहेरील मनमोहक दृश्याचा आनंद घेता येतो. प्रवाशांना पर्यटनासाठी उत्तम अनुभव मिळावा यासाठी कोचमध्ये रुंद खिडक्या विंडो पॅन आणि ३६० अंशांपर्यंत फिरणाऱ्या खुर्च्या आहेत.

व्हिस्टाडोम कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तयार केले गेले आहेत. या कोचची खास अशी रचना केली गेली आहे की १८० किमी पर्यंत सहज वेग पकडू शकेल. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित आणि मोठे स्लायडिंग दरवाजे प्रवास अधिक मनोरंजक बनवतात.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?

पुढील बातमी
इतर बातम्या