गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या दिवा स्थानकातूनच जातात. मात्र, सर्व गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येत नाही. त्यामुळे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेकडून कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी मध्य, कोकण रेल्वेतर्फे दरवर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. त्यातील काही गाड्यांना दिवा, पेण येथे यावेळी प्रथमच थांबे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला अाहे. सीएसएमटी-सावंतवाडी(०१००७), सावंतवाडी-सीएसएमटी(०१००८) या दोनच गाड्यांना येथे थांबा देण्यात आला आहे. पण दिवा स्थानकातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या गाड्यांनाही थांबा द्या
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई - रत्नागिरी (०१०३३)
२) लोकमान्य टिळक टर्मिनन्स - रत्नागिरी (०११८७/०११८८)
३) लोकमान्य टिळक टर्मिनन्स - पेडणे (०१०३७/०१०३८)
४) लोकमान्य टिळक टर्मिनन्स - झारप (०१०३९/०१०४०)
५) सावंतवाडी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई (०१०३६)
दिवा स्थानकात थांबा देण्यासाठी फलाटांची लांबी हे जरी मुख्य कारण असलं तरी वरील सर्व गाड्यांच्या संरचनेनुसार या गाड्यांना दिवा स्थानकात सहज थांबा दिला जाऊ शकतो. या परिसरात कोकणातील रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना गाडी पकडण्यासाठी डोंबिवली, ठाणे, कल्याण या अतिगर्दीच्या स्थानकात जावे लागते. लहान मुले, जेष्ठ यांना घेऊन या स्थानकातून गाडी पकडणे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. या सर्व गाड्या दिवा स्थानकात दोन मिनिटांसाठी थांबल्यास कोकणवासीय प्रवाशांना न्याय दिल्यासारखं होईल.
- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
हेही वाचा -
ओव्हर टाइम नाकारल्याने प. रेल्वेच्या १०० फेऱ्या रद्द
वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास