आता खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा?

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं लोकल सेवा सुरू केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतू, आता ही सेवा सुरू झाली असून, हळुहळू प्रवाशी संख्याही वाढत आहे. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर वकिल, बँक कर्मचारी यांसारख्या अनेक कर्मचाऱ्यांना प्रवास मुभा रेल्वे प्रशासनानं दिली. अशातच आता खासगी प्रवाशांनाही लवकरच लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

खासगी प्रवाशांसाठी राज्य सरकारनं हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्तांसह राज्य आणि रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या बैठकीत खासगी कंपन्यांतील एक-चतुर्थांश कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यावर प्राथमिक चर्चेत एकमत झाले आहे. त्यामुळ लवकरच सामान्यांच्या लोकल प्रवासाचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळत असले तरी लोकल केव्हा सुरू करायचा हा निर्णय सरकारचा असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकलच्या फेऱ्या वाढल्याने सामान्यांना सरसकट लोकल प्रवेशाची मुदत देण्यावर सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. आगामी सणासुदीच्या आधी खासगी कंपन्यातील ३० टक्के कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा द्यावी. हे ३० टक्के कर्मचारी निवडीचे स्वातंत्र्य कंपन्यांना असावे, हे करतानाच संबंधित कंपन्यांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे बंधनकारक करावे, असे पर्याय सुचवण्यात आल्याचं समजतं.

लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी क्षेत्रांनुसार कार्यालयीन वेळेत बदल करण्याचादेखील उपाय सुचवण्यात आला आहे. शहरातील कार्यालयांशी समन्वय साधण्यासाठी महापालिका तर उपायांच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याची चर्चा बैठकीत पार पडली.

खासगी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना-व्यवस्थापन यांच्या शिफारशी सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार याबाबत सरकार निर्णय घेणार आहे.


हेही वाचा - 

मुंबईत 'या' तारखेपासून धावणार मेट्रो

मेट्रोसोबत मोनोरेल ही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार


पुढील बातमी
इतर बातम्या