लोकलचे दरवाजे अडवाल, तर होईल कारवाई!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहून दुसऱ्या प्रवाशांची अडवणूक करतात. अनेकदा प्रवासी आपला ग्रुप बनवून दादागिरी करतात आणि नवीन प्रवाशाला ट्रेनमध्ये चढूच देत नाहीत. पण यापुढे असं करणं महागात पडू शकतं.

कारण, लोकलचे दरवाजे अडवून दुसऱ्या प्रवाशांना डब्यात शिरकाव करू न देणाऱ्या टोळक्याविरोधात बोरिवली पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मंगळवारी आरपीएफच्या साहाय्याने २८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात तीन स्टंटबाज देखील आहेत.

रेल्वे पोलिसांची मोहीम

काही दिवसांपूर्वी मीरारोडहून चर्चगेटकडे येणाऱ्या फास्ट लोकलमध्ये पत्रकाराला चढू न देता त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे हे आणि असे अनेक प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे पोलिस, आरपीएफने संयुक्त मोहीम अधिक तीव्र केली आहे.

स्टंटबाजी करणाऱ्या तिघांना अटक

बोरीवली रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, बोरीवलीचे कर्मचारी यांनी मिळून सकाळच्या वेळी विरार, वसई आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनमधून सुटणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणारे आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना अटकाव करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह १३ जणांना न्यायालयात हजार करण्यात आलं आहे. तर, बोरीवली रेल्वे पोलिस ठाण्यामार्फत रेल्वे प्रवाशांना अडथळा आणणाऱ्या १२ प्रवांशावर कारवाई करण्यात आली आहे.

शिवाय, अशा प्रकारची कारवाई यापुढेही सतत सुरू ठेवण्यात येणार असल्याचं बोरीवली रेल्वे पोलिस ठाणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या