एसटीच्या विविध संवर्गातील 'इतक्या' उमेदवारांच्या प्रशिक्षणावरील स्थगिती उठवली

कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूनं सन २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे ३११६ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यासर्व उमेदवाराचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर खंडित झाले होते, तेथून पुन्हा  सुरु  करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

यासंदर्भातील परिपत्रक संबंधित विभागांना माधव काळे  यांनी जारी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते.

अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने सन २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील  सुमारे ३११६ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये २८४६ पुरुष, चालक तथा वाहक, १६१ महिला, चालक तथा वाहक, २ पर्यवेक्षक व १०७ अधिकाऱ्याचा समावेश होता.

सध्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी / अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या   या  निर्णयाचे स्वागत  प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या