बोरीवली - रेल्वे सुरक्षा बलाने दोन हरवलेल्या मुलांची भेट त्यांच्या कुटुंबियांशी घडवून दिली आहे. 5 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक चारवर लोकल रेल्वेच्या अपंग डब्यात एक सहा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी रडत होते. त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. मात्र एका प्रवाशाने याची माहिती रेल्वे हेल्पलइनद्वारे आरपीएफच्या पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांनाही आपल्या कार्यालयात आणत त्यांची विचारणा केली असता मुलाचं नाव शुभम कनोजिया आणि मुलीचं नाव सलोनी कनोजिया असल्याचं समजलं. ट्रेनमध्ये चढताना मुलांचा त्यांच्या आईशी हात सुटल्याने ते दुरावले. मुलांनी दिलेल्या माहितीनंतर रेल्वे पोलिसांनी अंधेरी (पू.) साकीनाकातल्या हिमालय सोसायटी या पत्त्यावर जाऊन मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून दिली.