खासगी प्रवासी वाहनांच्या भाडेवाढीवर आरटीओचा लगाम

सणासुदीत किंवा सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर आता लगाम बसणार आहे. कारण अशा प्रकारे जादा तिकीट दर आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांवर आरटीओच्या विशेष पथकांची नजर राहणार आहे.

एसटी बस आणि रेल्वे गाड्या फुल्ल झाल्याने प्रवासी खासगी बसकडे वळतात. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली जाते. मात्र आता यावर चाप बसणार आहे. कारण अशा वाहनांवर आता आरटीओच्या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे यासंदर्भात परिवहन विभाग कार्यालयातून राज्यातील सर्व आरटीओंना आदेश देण्यात आले आहेत.

तरीही भाडेवाढ

राज्य सरकारने एप्रिल 2018 मध्ये खासगी प्रवासी वाहनांचे भाडे निश्चित केले आहेत. खासगी वाहनांना एसटी बस भाडेदराच्या तुलनेत दीडपट भाडे आकारता येण्याची मुभा आहे. जर त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रवासी परिवहन विभागाकडे तक्रार करू शकतात. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आतपर्यंत 76 तक्रारी परिवहन खात्याकडे आल्या आहेत. यामधील दोन प्रकरणांत दंड आकारण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयानंतरही दिवाळीत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारण्यात आले.

'येथे' करा तक्रार

परिवहन विभागाने अशा खासगी प्रवासी बसचालकांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाय परिवहन विभागाने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी 022-62426666 हा हेल्पलाइन क्रमांक आणि https://transport.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या