११ जानेवारीपासून एसटीचे सुरक्षा अभियान

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालवधीत सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. दररोज सुमारे ६५ लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे.

विश्वासाहततेची भावना

गेल्या ७१ वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासाहततेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशानं एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेदरम्यान चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो.

३४ हजार चालक

सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे ३४ हजार चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणं शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं एसटीनं चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे. अपघात विरहित सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख बक्षिसे देऊन राष्ट्रीय सणाच्या दिवशी गौरवण्यात येतं. चालकांना सुरक्षित प्रवासाचं महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचं मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीनं आगार पातळीवर समुपदेशन देखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या नगण्य आहे.

सुरक्षेची जबाबदारी

या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचं पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य या चतुसुत्रीचं पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचं आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी एका आवाहन पत्रकाद्वारे केलं आहे.


हेही वाचा -

मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?

बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांकडूनच लाखो लीटर पाणीचोरी


पुढील बातमी
इतर बातम्या