एसटी आली धावून! प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या ४० गाड्या

बेस्टच्या संपामुळे २५ लाख बेस्ट प्रवाशांचे मंगळवारी प्रचंड हाल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रवाशांच्या सोयीसाठी अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ (एसटी) धावून आलं आहे. एसटीने मुंबईच्या विविध मार्गावर ४० एसटी गाड्या सोडल्या आहेत. गरजेनुसार आणखी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचही एसटीकडून सांगण्यात आलं आहे. तर मेट्रोनेही प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन अाणखी मेट्रो सोडल्या अाहेत. या गाड्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

प्रवाशी वेठीस 

मंगळवारी मध्यरात्रीपासून बेस्ट संपाला सुरुवात झाली आहे. सुमारे ३ हजार २०० बेस्ट गाड्या रस्त्याऐवजी बेस्ट डेपोमध्ये उभ्या आहेत. तर ३० हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावताना दिसत नाही. बेस्ट बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ऑफिस, शाळा, कॉलेज गाठणं चाकरमान्याना अवघड होताना दिसत आहे. तर रिक्षा-टॅक्सीवाले या संधीचा चांगलाच फायदा घेत आहेत. प्रवाशांना वेठीस धरत दाम दुप्पट वसूल करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढत आहेत. बेस्ट आणि रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून वेठीस धरलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अखेर एसटी धावून आली आहे. एसटीने ४० गाड्या सोडल्या असून याचा  फायदा प्रवाशांना होणार आहे.

येथून सोडल्या एसटी

कुर्ला पश्चिम ते बांद्रा - ०५ गाड्या

कुर्ला पूर्व ते चेंबूर - ०५ गाड्या

दादर ते मंत्रालय - ०५ गाड्या

पनवेल ते मंत्रालय - ०५ गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय - ०५ गाड्या

ठाणे ते मंत्रालय - १५ गाड्या


हेही वाचा - 

मुंबईकर बेहाल, सकाळपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर नाही


पुढील बातमी
इतर बातम्या