काळाचौकी अभ्युदयनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांच्या मुलांसाठी तसेच विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसीय 'उन्हाळी चित्रकला प्रशिक्षण शिबिरा'चे आयोजन करण्यात आले आहे.
परीक्षा संपल्या, शाळेला सुट्टी लागली, आता फावल्या वेळेत करायचं काय? तर कम्प्युटर गेम, मोबाईलवर टाईमपास अथवा टिव्हीवर कार्टून नेटवर्क पाहणे एवढंच आताची मुलं करतात. त्यात घरासमोर खेळण्यासाठी जागा नाही आणि विभागातही पुरेशी उद्याने आणि मैदाने नाहीत. त्यामुळे मैदानी खेळ म्हणजे काय? हे देखील त्यांना माहीत नाही. यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अभ्युदयनगर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांच्या तसेच विभागातील मुलांसाठी चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा 18 एप्रिलपासून या शिबिराला सुरुवात झाली असून, 26 एप्रिलपर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. चित्रकला मुलांचा आवडीचा विषय असल्याने 4 ते 14 वर्ष वयोगटातील जवळपास 43 मुले या शिबिरात सहभागी झाली आहेत. आपल्या मनाला वाटेल, आवडेल अशी चित्र मनमोकळेपणाने काढायची तर आहेतच त्याचबरोबर प्रशिक्षक मोहन पेडणेकर चित्रकला, ओरोगामी, कॉफ्स आदी प्रकारची चित्र सोप्या पद्धतीने कशी काढता येतील यावर प्रशिक्षण देत आहेत.
मुलांनी शिबिरात आठवडाभर रेखाटलेल्या चित्रांचे 26 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शन भरविण्यात येणार असून, याच दिवशी पालक आणि मुलांना मार्गदर्शन करून या शिबिराचा समारोप करण्यात येईल असे केंद्र महिला कल्याण सहाय्यक हेमा तावडे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक संचालक समीर बांदीवडेकर, आरती मोहरकर, आणि अमोल धुरी उपस्थित होते.