Advertisement

'ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?

रोखठोक संवाद हे बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्य असल्याने त्यांच्या जीवन प्रवासातील काही प्रसंग जसेच्या तसे 'ठाकरे' या चित्रपटात उतरवण्यात आले आहेत. यापैकी काही दृश्यांवर तसंच संवादांवर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे.

'ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?
SHARES

आज मुंबईपासून अयोध्येपर्यंत संपूर्ण वातावरण भगवामय झालेलं आहे. याच वातावरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होत आहे. पण सेन्सॅारच्या कैचीत अडकल्याने प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील काही दृश्य व संवादांसोबतच ट्रेलरलाही कैची लावण्याचा आदेश सेन्सॅारने दिला आहे.


'ठाकरे'-सेन्सॅार आमनेसामने

रोखठोक संवाद हे बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्य असल्याने त्यांच्या जीवन प्रवासातील काही प्रसंग जसेच्या तसे 'ठाकरे' या चित्रपटात उतरवण्यात आले आहेत. यापैकी काही दृश्यांवर तसंच संवादांवर सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे. पण सेन्सॉरचा आक्षेप न जुमानता 'ठाकरे'चा ट्रेलर ठरल्याप्रमाणेच लाँच करण्यात येणार असल्याचा पवित्रा चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतल्याने वातावरण काहीसं तापलं आहे. त्यामुळे 'ठाकरे' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय शक्तीप्रदर्शन होणार असे संकेत मिळत आहे. 


संवादांवर आक्षेप

बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांची भाषणशैली इतरांपेक्षा खूप वेगळी होती. रोखठोक बोलण्यासाठी ते प्रसिद्ध होते. तोच रोखठोकपणा या चित्रपटात उतरवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी केला आहे. त्या अनुषंगाने या चित्रपटात बाळासाहेबांच्या गाजलेल्या भाषणांची काही दृश्येही या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहेत. भाषणांमधील 'त्या' संवादांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप असल्याची माहिती मिळाली आहे.


वाद होऊ शकतो - सेन्साॅर

इतकंच नव्हे तर 'बजाव पुंगी हटाव लुंगी' यांसारख्या दक्षिणात्यांविरोधातील घोषणांसोबतच बाबरी मशीद प्रकरणातील काही दृश्यांचा समावेशही 'ठाकरे'मध्ये असल्याचं समजतं. अशा प्रकारची दृश्ये आणि संवाद समाजातील शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरू शकतात, तसंच या दृश्यांमुळे भविष्यात काही वादंगही निर्माण होऊ शकतो. या कारणामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून बोर्डाने 'ठाकरे'मधील काही दृश्ये आणि संवादांवर कात्री लावण्याच्या सूचना दिल्याचंही समजतं. नेहमीच सडेतोड वक्तव्य करणारा शिवसेना पक्ष सेन्सॅारच्या या निर्णयानंतर कोणती भूमिका घेतो ते पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.



हेही वाचा - 

सलमान हिंदीत बनवणार ‘मुळशी पॅटर्न’




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा