आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काहीच दिवस बाकी आहेत. आपलं उत्पन्न जर कर पात्र असेल आणि आपण कर वाचविण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली नसेल तर आपल्याला गुंतवणूक करणं आवश्यक आहे. अनेक जण कर वाचवण्यासाठी गडबडीत गुंतवणूक करतात. पण नक्की कुठे गुंतवणूक करून कर वाचवायचा याची माहिती करदात्यांना मिळत नाही. कर बचतीसह गुंतवणुकीवर चांगला लाभ कसा मिळेल याकडं गुंतवणूकदारांना लक्ष द्यायला हवं. आम्ही येथे तुम्हाला असे काही पर्याय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाचा कर तर वाचेल पण या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळेल.
१) बँक मुदत ठेवी योजना
अनेक बँकांच्या मुदत ठेवीच्या योजना अाहेत. या मुदत ठेवीच्या रकमेवर कर सूट मिळते. यातून मिळणाऱ्या व्याजावर मात्र कर अाकारला जातो. या योजनांचा लाॅक इन पिरियड ५ वर्षांचा अाहे.
२) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
निवृत्तीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी अाणि कर बचतीसाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय अाहे. या योजनेतदीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. गुंतवणूकदारांना शेअर्स, बाँड्समध्ये गुंतवणूक करता येते.
३) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (ppf)
पीपीएफमधील १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर बचतीस पात्र अाहे. यावर मिळणारे व्याजही करमुक्त अाहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते. या योजनेत १५ वर्षांचा लाॅक इन पिरियड अाहे.
४) ईएलएसएस
ईएलएसएस ही कर बचतीची म्युच्युअल फंडांची एक योजना अाहे. ईएलएसएस योजनेत वार्षिक १ लाख ५० हजार रुपयांची कर सूट मिळू शकते. या फंडामधून तुम्हाला १२ ते १८ टक्के परतावा मिळू शकतो. या फंडाचा लाॅक इन पिरियड ३ वर्षांचा अाहे. म्हणजे ३ वर्षाच्या अात या फंडातून तुम्हाला तुमची गुंतवणूक काढता येणार नाही.
५) युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन (ULIP)
विमा संरक्षण, गुंतवणूक अाणि कर बचत असा तिहेरी लाभ देणारी ही योजना अाहे.विमा संरक्षणासह शेअर्समधील गुंतवणूकीचा फायदा या योजनेत मिळतो. ही योजना राबवणारी कंपनी गुंतवणुकीचा काही हिस्सा शेअर बाजारात गुंतवते. योजनेचा लाॅक इन पिरियड ३ वर्ष अाहे.
६) गृहकर्ज
गृहकर्ज व्याजाच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट दिली जाते. तसंच गृहकर्ज रकमेच्या परतफेडीवर २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट मिळते. जर तुमचं पहिलंच घर असेल तर ५० हजार रूपयांच्या व्याजाच्या रकमेवर अतिरिक्त कर सूट मिळेल.
७) शाळेची फी
मुलांच्या शाळा, काॅलेज, विद्यापिठातील शिक्षणासाठी भरलेल्या फी वर पालकांना कर सवलत मिळते. जास्तीत जास्त २ मुलांच्या फी वरच कर सूट मिळेल.
८) जीवन विमा योजना
सर्व प्रकारच्या जीवन विमा योजनांच्या प्रीमिमवर कर सवलत मिळते. पारंपारिक विमा, मुदतीचा विमा, युलिप, मनी बॅक अादी सर्व योजनांवर कर सूट मिळते.
हेही वाचा -
१ एप्रिलपासून प्राप्तिकर संबंधित ५ नियमात बदल, त्याचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार
तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे