Advertisement

मेट्रो 9 च्या डोंगरी कारशेडसाठी 1,400 झाडांची कत्तल

दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येत असून या कारशेडसाठी येथील 1,406 झाडे कापावी लागणार आहेत.

मेट्रो 9 च्या डोंगरी कारशेडसाठी 1,400 झाडांची कत्तल
SHARES

दहिसर (dahisar) ते मिरारोड (mira road) मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येत आहे. या कारशेडसाठी येथील 1,406 झाडे कापावी लागणार आहेत. त्यानुसार मिरा-भाईंदर पालिकेने (mbmc) याबाबत नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत.

स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध दर्शविला आहे. मिरारोड, उत्तनमधील डोंगरी हा एकमेव हिरवळीचा पट्टा आहे. अशावेळी हा पट्टा नष्ट झाल्यास पर्यावरणाला मोठा धक्का पोहचणार आहे. 

याचा मानवी आरोग्यावरही परिणाम होणार आहे. अशी भीती व्यक्त करत पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी ही वृक्षतोड रोखण्याची मागणी केली आहे. 

दहिसर ते मिरारोड ही 10.5 किमीची मेट्रो 9 (Metro 9) मार्गिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) हाती घेतली आहे. या मार्गिकेचे कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित केले होते. 

मात्र तेथील स्थानिकांचा विरोध पाहता राज्य सरकारने मेट्रो 9 चा उत्तन, डोंगरीपर्यंत विस्तार करत कारशेड (metro carshed) डोंगरी येथे बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे आता लवकरच कारशेडच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या कामासाठी येथील 1,406  झाडे कापावी लागणार असल्याने मिरा-भाईंदर पालिकेने यासंबंधी जाहीर सूचनेद्वारे नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत. 

स्थानिक नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी, पर्यावरणतज्ज्ञांनी वृक्षतोडीला विरोध करत अधिकाधिक सूचना, हरकती नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा 7 ऑक्टोबरला वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबईकरांना बीकेसी ते कफ परेड हा टप्पा कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा लागून राहणार आहे. 

दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मे 2025 अशी तारीख दिली आहे.  मात्र, त्या वेळेत हा संपूर्ण टप्पा पूर्ण होणार नाही. बीकेसी ते आचार्य अत्रे चौकपर्यंत टप्प्याचे काम मार्च 2025 मध्ये पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘एमएमआरसी’ने घेतला आहे. 

त्यानुसार तो मे 2025 मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. टप्पा 2 अ नावाने बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, तर टप्पा 2 ब नावाने आचार्य अत्रे चौक ते कफ परेड कार्यान्वित केला जाईल. 

टप्पा 2 अ कार्यान्वित झाल्यानंतर काही महिन्यांनी टप्पा 2 ब वाहतूक सेवेत दाखल होईल. ‘एमएमआरसीए' (MMRCA) च्या 33.5 किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेमुळे आरे ते बीकेसी प्रवास अतिवेगवान आणि सुकर झाला आहे. तरी त्याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही.

मात्र, ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा ‘एमएमआरसी’कडून केला जात आहे. आतापर्यंत बीकेसी ते कफ परेड मार्गिकेचे 88.1 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातील मे 2025 पर्यंत आरे ते आचार्य अत्रे चौक अशी भुयारी मेट्रो धावेल.

‘एमएमआरसी’ने काही महिन्यांपूर्वी आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कफ परेड हे तीन टप्पे जाहीर केले होते.  त्यानंतर त्यामध्ये आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते कफ परेड असा बदल करण्यात आला. 

आता त्यात पुन्हा बदल करून बीकेसी ते आचार्य अत्रे टप्पा आणि आचार्य अत्रे ते कफ परेड असे नवीन टप्पे असतील असे सांगण्यात आले आहे.

बीकेसी ते आचार्य अत्रे हा टप्पा मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.



हेही वाचा

घाटकोपर स्टेशनचा 2027 पर्यंत कायापालट होणार

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा