तिवरांची कत्तल करत त्याठिकाणी अनधिकृत झोपड्या उभारल्या जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून मानखुर्द परिसरात सुरू होता. याबाबत सोमवारी आणि मंगळवारी अशा दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याठिकाणी कारवाई करत 20 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
मानखुर्दमधील मंडाळा झोपडपट्टीच्या मागील बाजूस असलेल्या शिवनेरीनगरमधील बेकायदा झोपड्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्कासन पथकानेही कारवाई केली. यावेळी सुमारे वीस ते पंचवीस झोपड्या पाडण्यात आल्या. काही माफियांकडून तिवरांची कत्तल केल्यानंतर या झोपड्या याठिकाणी उभारल्या जात होत्या. त्यानंतर या झोपड्यांची 4 ते 5 लाखात विक्री केली जात होती. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र अशाच प्रकारे या परिसरात आणखी हजारो झोपड्या बांधल्या असल्याची माहिती स्थानिक रहिवासी बाबू शाह यांनी दिली आहे.