नववर्षाच्या स्वागतासाठी अख्खी मुंबापुरी सज्ज झाली आहे. हाॅटेल-रेस्टाॅरंट दिव्यांच्या रोषणाईनं झगमगली असून टेरेस पार्ट्यांच्या तयारीनंही वेग धरला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी करणाऱ्या मुंबईकरांचा उत्साह वाढवणारा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे. थर्टी फर्स्टला मुंबईतील सर्व हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि बार रात्रभर सुरू ठेवण्यास, रात्रभर नववर्षाच्या जल्लोष साजरा करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे न्यू इयरची झिंग मुंबईकरांना आणखी चढणार हे नक्की.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर वा देशभरातील पर्यटक गोवा आणि त्यापाठोपाठ कोकणाला पसंती देत असले तरी मुंबईतही मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत होतं. मुंबईतील हाॅटेल-रेस्टाॅरंट यादिवशी खच्चून भरतात. नववर्षाचं स्वागत म्हटलं की मेजवाणी आणि दारू या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. त्यामुळे दरवर्षी मुंबईतील हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि बार रात्री उशीरापर्यंत खुली असतात.
दरम्यान नाइट लाइफची संकल्पना मुंबईत राबवण्यासाठी आग्रही असणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी थर्टी फर्स्टला मुंबईतील हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि बार रात्रभर खुले ठेवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
ही मागणी सरकारनं अखेर मान्य केली आहे. सरकारकडून थर्टी फर्स्टच्या दिवशी रात्रभर हाॅटेल-रेस्टारंट आणि बार खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे थर्टी फर्स्टचा दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, नववर्षाचं स्वागत सुरक्षित वातावरणात व्हावं यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत. मुंबईत प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांसह सर्वच सरकारी यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.
हेही वाचा-
३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त