मुंबईतील सर्व मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर होतं. या गणेशमूर्तींचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर परदेशी पाहुण्यांसह मुंबईबाहेरचे पर्यटकही गर्दी करतात. चौपाटीवर होणारी भाविक आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेता महापालिकेनं या जागेचा आपत्कालिन परिस्थिती नियंत्रण आराखडा तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गिरगाव चौपाटीवरील मुख्य प्रवेशद्वाराची रुंदी वाढवण्यात आली आहे. बाप्पाचा हा मार्ग रुंद करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी आपापले मंडप मागच्या दिशेस सरकवले आहेत.
गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर व्यवस्था करण्यात आली असून अनंत चतुर्दशीला सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचं विसर्जन केलं जाणार असल्याने त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवेशद्वारांच्या सुरुवातीलाच अतिमहत्वाच्या लोकांसाठी वातानुकूलित शामियाना उभारण्यात आला आहे. मागील वर्षी शामियान्याचा एक भाग प्रायोगिक तत्वावर वातानुकूलित करण्यात आला होता. परंतु यंदा यावर्षी शामियानाचा ४० मीटर लांब आणि ७ मीटर रुंदीचा परिसर हा वातानुकूलित बनवण्यात आला आहे. तर पुढील भागातून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी दर्शनी भाग खुला ठेवण्यात आला आहे.
तर चौपाटीच्या दिशेला परदेशी पर्यटकांसाठी पूर्णपणे वातानुकूलित असा स्वतंत्र शामियाना उभारला आहे. यामध्ये २०० ते २५० परदेशी पाहुणे उपस्थित राहून गणेश विसर्जनाचा आनंद लुटू शकतो. सध्या ७० लोकांची बसण्याची व्यवस्था केली असली तरी तेथील आसन व्यवस्था वाढण्यात येणार असल्याची माहिती डी. विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.
या चौपाटीवरून मोठ्या गणेशमूर्तींच्या ट्रॉली अथवा ट्रक समुद्रातील वाळूतून पुढे नेता यावा यासाठी स्टील प्लेट टाकल्या जातात. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा समुद्रातील १ हजार चौरस मीटरचा परिसरातील स्टील प्लेट वाढण्यात आल्या आहेत. यंदा एकूण ४ हजार ५०० चौरस मीटरचा परिसरात स्टील प्लेट टाकण्यात आल्या असून यासाठी ४७० स्टील प्लेटचा वापर यासाठी करण्यात आला आहे.
गिरगाव चौपाटीच्या प्रवेशद्वारातून चौपाटीवर जाण्याचा मार्ग ८० चौरस मीटर रुंदीचा होता. त्यामुळे जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी ४० मीटर रुंदीच्या मार्गिका बनवण्यात यायच्या. परंतु यंदा प्रवेशद्वार १० मीटरने वाढण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही मार्गिकांमध्ये प्रत्येकी ५ मीटरने वाढ झालेली आहे. त्यामुळे ४० मीटरच्या मार्गिका आता ४५ मीटर लांबीच्या झाल्या असून यासाठी पोलिसांसह महापालिकांचे सर्व मंडप मागच्या बाजूला सरकवण्यात आल्याचं मोटे यांनी स्पष्ट केलंय.
याशिवाय चौपाटीवर प्रत्येक ठिकाणी निर्माल्य कलश, कचरा पेट्या, सार्वजनिक शौचालय, जीवरक्षक, तसेच विसर्जनासाठी ८ मोटरबोट असलेल्या तराफांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय येथील स्वच्छतेसाठी तसेच इतर व्यवस्थेसाठी महापालिकेचे कामगार, कर्मचारी आणि अधिकारीही मोठ्या संख्येने अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौपाटीवर राहणार आहेत.
गणेशोत्सवात प्रत्येक मंडळातून निर्माण होणारं निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेच्यावतीनं विशेष प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या डी विभागांमध्ये अर्थात ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल भागांमध्ये एकूण १३६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून या सर्व मंडळांमधून दरदिवशी निर्माल्य गोळा केलं जात आहे. याशिवाय गिरगाव चौपाटीवरही निर्माल्य कलश ठेवण्यात आल्यामुळे गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी यामध्ये निर्माल्य जमा केलं. त्यामुळे मागील ७ दिवसांमध्ये डी. विभागामध्ये सुमारे ७० टन निर्माल्य गोळा झाल्याची माहिती मोटे यांनी दिली आहे.
मुंबईत यावर्षींपासून प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात दिसून येत असून एरवी निर्माल्यांमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल दिसून यायचं. परंतु त्यातुलनेत यंदा प्लास्टिक व थर्माकोल दिसून येत नाही. गणेशोत्सवापूर्वी सर्व मंडळांची भेट घेऊन त्यांना या बंदी बाबतची कल्पना देऊन याचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याचा परिणाम निर्माल्याच्या माध्यमातून दिसून येत असल्याचं मोटे यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा-
अखेर आयुक्तांना शहाणपण सुचलं, कार्यकारी अभियंतांच पदनिर्देशित अधिकारी
शहरात ४४ मंडप बेकायदा, महापालिकेची कबुली