मुंबईसह राज्यात येत्या २ महिन्यात पावसाच आगमन होणार आहे. त्यामुळ महापालिका प्रशासनाने पावसाळा पूर्वतयारीच्या कामांनाही सुरुवात केली आहे. पावसाळा पूर्वतयारीच्या कामांमध्ये कोरोनाचे पालन करा असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतेच सर्व संबंधित यंत्रणांना दिले. तसेच पावसाळ्यापूर्वी मेट्रो प्राधिकरणांनी बांधकामाचा राडारोडा हटवावा, धोकायदायक इमारती रिकाम्या कराव्या, तसेच विद्युत वितरण कंपन्यांनी वीजवाहिन्यांचे सर्वेक्षण करावे, असेही निर्देश त्यांनी संबंधित प्राधिकरणांना दिले.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जावा, या उद्देशाने पालिका आयुक्त चहल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आयुक्तांनी विविध यंत्रणांकडून त्यांच्या स्तरावर करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.
पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, या दृष्टीने विविध ठिकाणी नालेसफाईची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. रेल्वे हद्दीमध्ये रेल्वे प्रशासनाद्वारे व महापालिकेच्या आर्थिक सहकार्यातून नालेसफाईची कामे करण्यात येत आहेत. या नालेसफाईच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला.
मुंबईत अनेक जुन्या इमारती या म्हाडाच्या अखत्यारीत असून यापैकी धोकादायक इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, त्याकरिता पोलीस दलाचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना आयुक्तांनी म्हाडा प्रशासनाला केली.
मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मुंबई मेट्रो रेल्वेची कामे प्रगतिपथावर आहेत. या बांधकामातून निघणारा राडारोडा वेळच्या वेळी हलवावा तसेच या कामांमुळे पावसाळ्यादरम्यान कुठेही पाणी साचणार नाही, याची काटेकोर काळजी मुंबई मेट्रो प्रशासनाने घ्यावी, असेही आयुक्त या वेळी म्हणाले. त्याचबरोबर सर्व विद्युत वितरण कंपन्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी तसेच विद्युत वितरण व्यवस्थेचे आवश्यक ते सर्वेक्षण (ऑडिट) करवून घ्यावे.
दरवर्षी प्रमाणेच भारतीय नौदल हे आवश्यक त्या संसाधनासह व बचाव पथकांसह सुसज्ज असल्याची माहिती भारतीय नौदलातील कप्तान परेश यांनी बैठकीत दिली. तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे चमू आवश्यक त्या संसाधनांसह तैनात राहणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई पोलीस दल पावसाळ्यादरम्यान तत्पर असेल, अशी ग्वाही मुंबई पोलीस दलाने बैठकीत दिली. यासोबतच मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, हॅम रेडिओ इत्यादींच्या प्रतिनिधींनीही पावसाळापूर्व तयारीची माहिती बैठकीदरम्यान दिली.