भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर, २०१७ रोजी होणाऱ्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर येण्याची शक्यता आहे. या सर्व अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सेवा-सुविधा उपलब्ध करून देतानाच यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून शिवाजी पार्क येथे मोबाईल चार्जिंगची सेवा दिली जाणार आहे. शिवाजीपार्क येथे तब्बल ३०० चार्जिंग पॉईंट्सची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून शिवाय २६० न्हाणी घरांमध्ये शॉवरची व्यवस्था केली जाणार आहे.
महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी महापालिका मुख्यालयात विविध विभागांचे प्रमुख, एमएमआरडीए, पोलीस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त नरेंद्र बर्डे, रमेश पवार, सुनील धामणे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर, भंते करुणानंद थेरो, साधनानंद थेरो आणि राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, उपाध्यक्ष रवी गरुड, सरचिटणीस नागसेन कांबळे आणि इतर संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथे आणि शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळया ठिकाणी फिरती शौचालये, रांगेत उभे असणाऱ्या अनुयायांसाठी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या अनुयायांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाक या सुविधाही पुरवण्याबाबत प्रशासनातर्फे तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वच्छतेच्या अनुषंगाने सुमारे १५३५ कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक ५० मीटर अंतरावर कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील. कर्मचाऱ्यांवर ताण पडू नये, यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आठ तासांवरून सहा तास करण्यात आली आहे. समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबतच राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या ठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुपरेज मैदान येथे शौचालयांची व्यवस्था, अनुयायी ज्या-ज्या स्टेशनवर उतरतात, त्या ठिकाणी प्रथमदर्शनी मोठे दिशादर्शक फलक तसेच चैत्यभूमीवर जाणारे बस क्रमांक नोंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा