देशाच्या सीमा भागात देशाचे जवान जसे देशाचे संरक्षण करतात, अगदी त्याच पद्धतीने महापालिकेचा सुरक्षा विभाग पालिकेच्या मालमत्ता व आस्थापनांचे संरक्षण करत असतो. त्यामुळे महापालिकेच्या कामाची व्याप्ती लक्षात घेता पुन्हा एकदा महापालिकेची 'कंमाडो फोर्स' नव्याने सुरू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. ही 'कंमाडो फोर्स' सुरू करण्यासंदर्भात प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५२ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण सभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या हस्ते गुरुवारी भांडुप संकुल, खिंडीपाडा रोड, भांडुप(पश्चिम) येथे संपन्न झाला. त्यावेळी सिंघल बोलत होते.
अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध स्तरावरील पारितोषिक पटकावल्याबदल मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी विविध प्रात्यक्षिके सादर केली. महापालिकेचे कार्यक्षेत्र कुलाबापासून तानसा वैतरणा धरणापर्यंत व्यापलेले आहे. महापालिकेच्या विविध आस्थापनांचे जतन व संरक्षण करण्याचे महत्वपूर्ण काम महापालिका सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी करीत असतात. हे लक्षात घेता महापालिकेचा सुरक्षा विभाग अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन विजय सिंघल यांनी केले.
महापालिकेचा सुरक्षा विभाग सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यनिष्ठेने आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या स्तरावर या विभागात काळानुरुप आवश्यक ते बदल करुन आवश्यक ती अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) डॉ. किशोर क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
महापालिकेचा सुरक्षा विभाग हा १ मार्च १९६६ मध्ये स्थापन झाला असून आज या विभागात चार हजार सुरक्षा कर्मचारी व १०० पेक्षा जास्त अधिकारी कार्यरत आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेली जबाबदारी सांभाळण्यास हा विभाग सक्षम असल्याचे प्रमुख सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.