बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतून आतापर्यंत ६ मृतदेह गायब झाल्याचा आरोप प्रसारमाध्यमातून करण्यात येत आहेत. परंतु हे मृतदेह बेपत्ता झालेले नाहीत, असा खुलासा महापालिकेकडून (coronavirus live updates bmc denies allegations to misplace dead body from any civic run hospital) करण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयातून अर्धा डझन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मुंबईतील कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचा संबंध इतर मृतदेहांशी जोडण्यात आला होता.
काय म्हटलंय खुलाशात?
मुंबई महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांबाबत खुलासा करताना म्हटलं आहे की, केईएम, नायर, सायन, जोगेश्वरी ट्रॉमा, कांदिवली शताब्दी या रुग्णालयांच्या संदर्भातील मृतदेहांच्या प्रकरणांचा उलगडा झाला असून त्यांची वस्तुस्थिती प्रशासनाने वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मुख्यत: नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने किंवा नातेवाईकांशी उशिरा संपर्क झाल्याने या घटना घडल्या असल्या तरी त्यांचं प्रशासनाने कधीही समर्थन केलेलं नाही. ६ पैकी ५ प्रकरणांत मृतदेहांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना अवगत करण्यात आलं अथवा कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलीस प्रशासनासमवेत उचित कार्यवाही करण्यात आली आहे.
हेही वाचा- ये हो क्या रहा है? BMC रुग्णालयांतून अर्धा डझन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब- किरीट सोमय्या
राजावाडी रुग्णालयातील मृतदेह प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून त्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारा खुलासा स्वतंत्रपणे पाठवण्यात येत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ नये, तसंच आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, हीच महानगरपालिका प्रशासनाची पुनश्च विनंती आहे, असं नमूद करण्यात आलं आहे.
सोमय्यांचा आरोप
मागील काही दिवसांमध्ये महापालिकेच्या विविध रुग्णालयातून अर्धा डझन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह हरवले/ गायब झाले आहेत. असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र देखील लिहिलं. आपल्या पत्रात ते म्हणतात की, गेल्या काही दिवसांत मुंबईतून कोरोनाग्रस्त अर्धा डझन मृतदेह रुग्णालयातून गायब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पत्रात त्यांनी गायब कोरोनाबाधित रुग्णांची नावं आणि केईएम रुग्णालय- परळ, राजावाडी रुग्णालय-घाटकोपर, शताब्दी रुग्णालय- कांदिवली, नायर रुग्णालय- वरळी, सायन रुग्णालय- शीव आणि ट्राॅमा केअर रुग्णालय- जोगेश्वरी या रुग्णालयांचा उल्लेख केला आहे. मृतदेह गायब होणाऱ्या कुटुंबाच्या मन:स्थितीचा विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती देखील किरीट सोमय्या यांनी पत्रातून केली आहे.
हेही वाचा- मुंबई महापालिकेच्या प्रभारी उपायुक्तांचं कोरोनामुळे निधन