कोरोनाच्या संसर्गामुळं मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं नुकतंच समोर आलं. आता बुधवारी मुंबई महापालिकेतील एका अधिकाऱ्याचा कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला. मुंबई महापालिकेनं ट्विटद्वारे ही माहिती दिली.
हा अधिकारी जी-नॉर्थ विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांच्याकडे धारावीतील बेघरांना अन्न पुरवण्याची (BMC Officer Died) जबाबदारी होती.
अवघ्या देशावर कोरोनाचं संकट कोसळलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण मुंबईत असून, मृतांची संख्याही अधिक आहे. आरोग्य यंत्रणा, महापालिकेचे कर्मचारी-अधिकारी आणि पोलीस यंत्रणा मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र काम करत आहे. करोना विषाणूनं आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेला विळखा घातला आहे.
मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिका प्रशासनालाही करोनानं मोठा धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील अॅसेसमेंट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत निरीक्षकांचा आज कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. याबाबत मुंबई महापालिकेनं ट्विट करून माहिती दिली. तसंच त्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण ६ हजार ६४४ रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत २७० कोरोनामृत्यू नोंदले गेले आहेत. शहरात २४ तासांत ४७५ रुग्णांची वाढ झाली.
राज्यात झालेल्या ३२ कोरोना मृत्यूंपैकी मुंबईचे २६ सोडले. तर पुणे शहरात ३, सोलापूर औरंगाबाद आणि पनवेल शहरात प्रत्येकी १ मृत्यू नोंदला गेला आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांना बरं करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यापैकी २०५ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज मिळाला.
सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. १० हजार ८१३ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. आजपर्यंत १ हजार ५९३ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.