मीरा रोड (mira road) येथे प्रस्तावित सर्वधर्मीय दफनभूमीला (graveyard) विरोध होऊ लागल्याने अखेर पालिकेने हा निर्णय रद्द केला आहे. या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालिकेने सांगितले.
मिरा रोड येथे 15 कोटी रुपये खर्चून सर्वधर्मीय दफनभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दफनभूमीची घोषणा झाल्यानंतर या भागातील आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. यात स्थानिक पातळीवर राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्याने प्रकरण अधिक तापले.
सतत नागरिकांकडून विरोध प्रदर्शन केला जात होता. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही जाहीर केले होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच मतदारसंघात विरोधातील वातावरण तयार होत असल्याचे लक्षात येता यावर नमती भूमिका घेण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. सोमवारी दफनभूमी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सरनाईक यांच्या कार्यालयात भेट दिली होती.
याप्रसंगी सरनाईकांसह महापालिका (mbmc) आयुक्त संजय काटकर देखील उपस्थित होते. नागरिकांचा विरोध असल्यास असे कोणतेही काम आपण करणार नसल्याचे सांगत सरनाईकांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती काटकरांकडे केली.
यावर नागरिकांच्या भावना लक्षात घेता दफनभूमीचा निर्णय रद्द करत असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे तसेच या जागेवर उद्यान उभारणार असल्याची ‘घोषणा आयुक्त काटकर यांनी यावेळी केली.
हेही वाचा